मुंबई : अल्पवयीन गतिमंद मुलीसोबत गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या सामूहिक लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना २५ जूनला उघडकीस आली. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी नीलेश रवींद्र निरभवणे (२०) या नराधमाला गजाआड केले. तर या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य साथीदाराचा शोध सुरू केला आहे. घाटकोपर पूर्वेकडील एका झोपडपट्टीत तक्रारदार प्रिया (नाव बदलले आहे) आई-वडिलांसोबत राहते. वडिलांना अर्धांगवायूचा झटका आल्याने ते घरीच असतात, तर आई अन्य ठिकाणी घरकाम करते. त्याचाच फायदा घेत मे २०१५ ते २३ जूनपर्यंत तिच्यावर अत्याचार सुरू होते. दोघेही आरोपी प्रियाला राहत्या घरातून जवळच्या सार्वजनिक शौचालयात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करत, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे.२३ जूनला प्रियाला अचानक त्रास होऊ लागला. तो शाळेतील शिक्षिकेच्या लक्षात आला. शिक्षिकेने विचारपूस केल्यानंतर सर्व प्रकार उघड झाला. शाळेच्या प्रशासनाने तिच्या पालकांना बोलावून घेत या प्रकाराची माहिती दिली. २५ जून रोजी या प्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी नीलेश व त्याच्या साथीदाराविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवला.प्रियाने शिक्षिकेला दिलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी काल नीलेशला अटक केली. अन्य साथीदाराबाबत पोलीस नीलेशकडे कसून चौकशी करीत आहेत. गुन्हा नोंदविल्यानंतर प्रियाच्या वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या. प्राथमिक तपासणी अहवालातून प्रियावरील लैंगिक अत्याचार स्पष्ट झाले आहेत. मात्र अंतिम अहवाल हाती आलेला नाही. दोनेक दिवसांत अहवाल मिळाल्यावर या प्रकरणावर आणखी प्रकाश पडेल, अशी माहिती पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर धनावडे यांनी दिली. दरम्यान, बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी नीलेश याने डान्स इंडिया डान्स या रियालीटी-शोमध्ये पारितोषिक पटकावले होते. तसेच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एबीसीडी २ या चित्रपटातही त्याने साईड डान्सर म्हणून काम केले आहे, अशी माहिती पंतनगर पोलिसांना मिळाली आहे. तक्रार मागे घेण्यासाठी धमकीरविवारी या प्रकरणातील आरोपी नीलेश निरभवणे (२०) याच्या वडिलांनी तक्रार मागे घेण्यासाठी प्रियाच्या पालकांना धमकावले. या घटनेनंतर स्थानिक रहिवासी संतापले. त्यांनी रात्री उशिरा पंतनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. तेव्हा पोलिसांनी नीलेशच्या वडिलांविरोधात एनसी नोंदवली.
अल्पवयीन गतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार !
By admin | Updated: June 30, 2015 02:39 IST