मुंबई: मुंबईसारख्या मेगा सिटीमध्ये मांसविक्री बंदी अयोग्य असल्याचे मत उच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केले. जैन धर्मियांना मटणावर आक्षेप होता, तर त्यांनी मटण शॉपमधील प्रदर्शनाला विरोध करायला हवा होता. राज्य शासन व महापालिकेला मांसविक्रीवर बंदी आणायची होती, मग चिकनवर बंदी का नाही? असे खडे बोलही न्यायालयाने सुनावले.मटण डिलर असोसिएशनने मांसविक्रीबंदी विरोधात याचिका केली आहे. १०, १३, १७ व १८ सप्टेंबर रोजी ही बंदी आहे. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता ही बंदी लागू करण्यात आली आहे. हे गैर असून ही बंदी रद्द करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर न्या. अनुप मोहता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मांसाहारविक्री बंदी असली तरी पॅकिंगमध्ये उपलब्ध असलेल्या मटण व चिकनवर प्रशासन कशी बंदी घालणार? असा सवालही न्यायालयाने विचारला. तसेच या बंदीचा खुलासा राज्य शासनव पालिकेने उद्या, शुक्रवारी तत्काळ करावा, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. (प्रतिनिधी)
‘मुंबईसारख्या मेगासिटीत मांसविक्री बंदी अयोग्य’
By admin | Updated: September 11, 2015 03:22 IST