ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. १० - मध्य रेल्वेच्या जलद मार्गावर सकाळी वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर प्रशासनाने ठाणे ते कल्याण दरम्यानचा मेगा ब्लॉक रद्द केला. सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार होता. कळवा-मुंब्र्या दरम्यानच्या पारसिक बोगद्याजवळ लोकलची कपलिंग तुटल्यामुळे मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
कल्याणहून सीएसटीच्या दिशेने येणा-या लोकलचे सकाळी ८.२० च्या सुमारास कपलिंग तुटले. ही घटना समजताच दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दुरुस्तीचे काम पूर्ण करुन मार्ग पूर्ववत करण्यात आला.
दोन लोकल डब्ब्यांना जोडणारी कपलिंग तुटल्यामुळे दोन डब्बे वेगवेगळे झाले होते. जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवल्या होत्या. सकाळी जलद मार्गावरील सीएसटीच्या दिशेने येणा-या लोकल खोळंबल्या. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने प्रवासी संख्या कमी आहे. मात्र या समस्येमुळे प्रवाशांचे हाल झाले.
कसारा ते सीएसटी दरम्यान जलद मार्गावरुन धावणा-या लोकलचे कपलिंग रविवारी सकाळी पारसिक बोगद्याजवळ तुटले. त्यावेळी झालेल्या धावपळीत डब्ब्यातून खाली उतरताना डोबिंवलीतील एका महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तीला चालता येत नव्हते. ही बाब लक्षात येताच लोकमतचे पत्रकार कुमार बडदे यानी त्वरीत रूग्णवाहिकेची व्यवस्था करुन तीला रुग्णालयात पोहचवले.
Proposed Today's CR Mega Block on Main Line btwn Thane and Kalyan from 11.30 hrs to 15.30 hrs is cancelled.— Central Railway (@Central_Railway) July 10, 2016