कणेरी : महाराष्ट्र शासनाच्या उदासीन वृत्तीमुळे कोल्हापूर जिल्हा परिसरातील उद्योजक कर्नाटककडे जाण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चर असोसिएशनकडे (गोशिमा) जमा झालेले १२०५ प्रस्ताव शिष्टमंडळाने बेळगाव येथे जिल्हा उद्योग केंद्राचे उपसंचालक प्रवीण रामदुर्ग यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हस्तांतर केले. महाराष्ट्र शासनाच्या उदासीन वृत्तीमुळे कोल्हापूर जिल्हा परिसरातील सुमारे १२०० उद्योजकांनी कर्नाटकमध्ये विस्तारीकरण व नवीन उद्योग स्थापनेकरिता इंडस्ट्रीयल प्लॉटसाठी गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (गोशिमा)कडे लेखी स्वरूपात अर्ज केलेले आहेत. गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनकडे १२०५ उद्योजकांनी प्रस्ताव देऊन १३०४ एकर जागेची मागणी केलेली आहे. याबाबत सोमवारी (दि. ५)‘गोशिमा’चे चेअरमन उदय दुधाणे, व्हा. चेअरमन संजय उरमनट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने बेळगाव जिल्हा उद्योग केंद्राचे उपसंचालक प्रवीण रामदुर्ग, के. एस. एस. आय. डी. सी.चे अतिरिक्त महाव्यवस्थापक आर. एस. पाटील यांची भेट घेतली. ‘गोशिमा’कडे जमा झालेले १२०५ प्रस्ताव त्यांच्याकडे हस्तांतरीत करून पुढील कार्यवाहीसाठी विनंती केली. आडी मल्लया डोंगरानजीक ३८० एकर सरकारी जमीन अनुकूल असून याबाबतीत अग्रक्रम देऊन सर्वेक्षण पूर्ण करून महसूल खात्याकडून संबंधित जागा औद्योगिक वसाहतीसाठी वर्ग करण्याची प्रक्रिया चालू आहे. तसेच आजूबाजूच्या खासगी जमिनींचे सर्वेक्षण शेतकर्यांच्या संमतीने सुरू असल्याचे आर. एस. पाटील यांनी सांगितले. याबाबत ‘गोशिमा’चे चेअरमन उदय दुधाणे यांनी समाधान व्यक्त केले असून, लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर ‘गोशिमा’ उद्योजकांचे शिष्टमंडळ कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांना तातडीने भेटून पुढील कार्यवाही पूर्ण करणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)
१२०० उद्योजकांचे प्रस्ताव सादर ‘गोशिमा’ शिष्टमंडळ भेटले
By admin | Updated: May 8, 2014 12:19 IST