नांदेड : एनईईटी त्यानंतर सीईटी, पुन्हा अभ्यासक्रमातील बदल, ऐनवेळी घेतले जात असलेले निर्णय यामुळे वैतागलेल्या विद्यार्थ्यांना मेडिकल सीईटीच्या निकालातही कटू अनुभवाला सामोरे जावे लागले. जीवशास्त्रातील बरोबर असलेले उत्तर अखेरच्या क्षणी चूक ठरवत शेकडो विद्यार्थ्यांचे पैकीच्या पैकी गुण मिळविण्याचे स्वप्न धुळीस मिळविले. संदिग्ध प्रश्नामुळे तीन गुणांचे सरसकट वाटप केल्यानंतर भौतिक शास्त्र व जीवशास्त्रातील प्रत्येकी एक प्रश्नाचे उत्तर अंतिमत: बदलण्यात आल्याने पावणेदोन लाख विद्यार्थ्यांच्या गुणांचा आलेख खालावला. विशेष म्हणजे, जीवशास्त्रातील बरोबर उत्तर चुकीचे ठरविल्याचा दावा विषयतज्ज्ञ प्रा. गणेश चौगुले यांनी संदर्भासह केला आहे. प्लाझ्मा सेल्स आर डिराईव्हड फ्रॉम या प्रश्नासाठी २० मे रोजी प्रसिद्ध केलेल्या उत्तरसूचीनुसार मेमरी-बी सेल्स हे उत्तर देण्यात आले होते़ ५ जून रोजी या प्रश्नाच्या उत्तरात बदल करत आॅनलाइन घोषित केलेल्या निकालानुसार या प्रश्नाचे योग्य उत्तर हेल्पर-टी सेल्स असल्याचे वैद्यकीय संचालनालयाने जाहीर केले़, परंतु उपरोक्त उत्तर चूक असून, पूर्वीच्या सूचीतील मेमरी-बी सेल्स हेच उत्तर बरोबर असल्याचे विद्यार्थी तसेच या विषयातील प्राध्यापकांचे म्हणणे आहे़ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुस्तकानुसार या प्रश्नाचे उत्तर अॅक्टिव्हेटेड-बी सेल्स असे असावयास हवे होते़ परंतु वैद्यकीय संचालनालयाने घेतलेल्या सीईटी परीक्षेत सदरील प्रश्नाच्या उत्तरातील चारही पर्यायात हे उत्तर देण्यात आलेले नाही़ हेल्पर-टी सेल्स या केवळ बी-लिम्फोसाइट सेल्सला स्टीमुलेट केल्यावर बी-लिम्फोसाइटचे रूपांतर अॅक्टिव्हेटेड बी-लिम्फोसाइटमध्ये होते़ त्यानंतर यापासून प्लाझ्मा सेल्सची निर्मिती होते़ परंतु प्रश्नात प्लाझ्मा सेल्स आर डिराईव्हड फ्रॉम अर्थात त्या कोणापासून निर्मित होतात, असे विचारले आहे़ निर्मितीला चालना देणे, स्टीमुलेट आणि निर्मिती करणे या दोन्ही बाबी विभिन्न आहेत़ जेव्हा पहिल्यांदा रोगाचा प्रादुर्भाव होतो़ त्यानंतर मेमरी-बी सेल्स तयार होतात़ याच मेमरी-बी सेल्स दुसऱ्यावेळी कार्यान्वित होतात तेव्हा यापासूनही प्लाझ्मा सेल्सची निर्मिती होते़ त्यापासून अँटीबॉडीज तयार होतात असे प्रतिक्षमताशास्त्राच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावरील पुस्तकात नमूद आहे, परंतु याचा उल्लेख महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या पुस्तकात कुठेही आढळून येत नसल्याचे प्रा. चौगुले यांनी स्पष्ट केले.
मेडिकल सीईटीचा अखेरपर्यंत घोळ
By admin | Updated: June 7, 2015 02:42 IST