शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

मी आणि माझी भटकंती

By admin | Updated: September 25, 2016 02:03 IST

साधारणत: इयत्ता पाचवी किंवा सहावीत असेन मी. क्लास आणि शाळेच्या दिनक्रमात कधी रविवार येतो, याची मी उत्सुकतेने वाट पाहायचे आणि त्याचं कारणसुद्धा तसं खासच होतं.

- शर्वरी जमेनीससाधारणत: इयत्ता पाचवी किंवा सहावीत असेन मी. क्लास आणि शाळेच्या दिनक्रमात कधी रविवार येतो, याची मी उत्सुकतेने वाट पाहायचे आणि त्याचं कारणसुद्धा तसं खासच होतं. रविवारी बाबांना सुटी असायची आणि ते आम्हाला पुण्याच्या आसपासच्या शांत, निवांत ठिकाणी फिरायला घेऊन जायचे. ही स्थळं म्हणजे दरवेळीच काही सिंहगड किंवा बनेश्वर नसायची तर कधी कधी पुण्याजवळच्या वारजे-माळवाडी इथल्या टोमॅटो, वांग्याच्या शेतातसुद्धा ते आम्हाला घेऊन जायचे. पण तेव्हापासून निसर्गाच्या सान्निध्यात मला खूप आवडायला लागलं आणि हीच खरं तर माझ्या भटकंतीची सुरुवात होती.भटकंतीत अनेक कारखाने, संस्थांनाही भेटी दिल्या. अशीच एक अचानक दिसलेली संस्था मनात कायमचं घर करून बसली. ही संस्था म्हणजे भाजे लेण्याच्या पायथ्याशी असलेली ‘बालग्राम’ ही संस्था. भाजेलेणे चित्रित करून आम्ही खाली उतरत होतो आणि अचानक ही संस्था दिसली. सहज म्हणून डोकावलो आणि तिथल्या निरागस, छोट्या मुलांनी आम्हाला खिळवून ठेवलं. ही मुले काही अनाथ होती तर काही वेश्यांची होती, पण कुणातही फरक केलेला नव्हता. खेळायला मोठे मैदान, सर्व सुखसोयी, पंधरा पंधरा मुलांचा गट आणि त्यांना एक आई. ती आई म्हणजेसुद्धा ज्या बायकांना नवऱ्यांनी टाकलंय किंवा विधवा किंवाज्यांचे समाजात कोणी नाही अशा स्त्रिया. इथली पूर्ण व्यवस्था पद्धती आणि शिक्षण पद्धती यांनी खूपच भारावले. इथे नि:स्वार्थीपणे झटणारे संस्थेचे स्थापनकर्ते बॅनर्जी यांना भेटून कृतकृत्य झाले. त्याचवेळी बाहेर पडताना ठरवले की, यातल्या एका विद्यार्थ्याची शैक्षणिक जबाबदारी आपण उचलावी. त्याप्रमाणे खरंच दरवर्षी मी माझ्याकडून जेवढी मदत होऊ शकेल तेवढी करायला सुरुवात केली आणि भटकंतीच्या नादातूनएक सामाजिक काम आपल्या हातून घडल्याचा आनंद मला मिळाला. पंडिता रोहिणी भाटे यांच्या ‘नृत्यभारती’ या कथ्थक नृत्याच्या संस्थेत वयाच्या सातव्या वर्षीच दाखल झाले होते. त्यामुळे एव्हाना एवढी गोडी निर्माण झाली होती की त्यातच करिअर करायचं ठरवलं. आणि पुढे एम.ए.पर्यंतचा प्रवास हा नृत्याशी संबंधित झाला. या दरम्यान भारतातल्या अनेक प्र्रमुख शहरांची भटकंती मी नृत्यामुळे करू शकले. दिल्ली-जयपूर-लखनौ ही तर दरवर्षीची ठिकाणे होती. याखेरीज भुवनेश्वर, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, बंगलोर, गोवा ते अगदी अलाहाबाद आणि इंदोरजवळच्या ‘देवास’ या पं. कुमार गंधर्व यांच्या गावी जाण्याची संधीसुद्धा नृत्यामुळेच मिळाली.पुढे एम.ए. झाल्यानंतर नृत्याचा सराव चालू असतानाच अचानक ‘बिनधास्त’ या चित्रपटाविषयी विचारण्यात आलं आणि नृत्याच्या क्षेत्रात रमलेली मी अचानक अभिनयाच्या क्षेत्राकडेही वळले. पण मनाशी पक्कं ठरलेलं होतं की या दोन्ही क्षेत्रांत समतोल राखायचा. त्यामुळे नृत्य आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रांत माझा समांतर प्रवास चालू झाला. या काळातच युनिक फिचर्सचे संतोष कोल्हे यांनी ‘भटकंती’ या मालिकेचा प्रस्ताव मांडला. मिलिंद गुणाजी यांच्या ‘माझी मुलुखगिरी’ या पुस्तकावर आधारित ही मालिका बनविण्याचा त्यांचा प्रकल्प होता. भटकंतीच्या दरम्यान केवळ निसर्गाच्याच अप्रतिम रूपांची दर्शने झाली नाहीत तर काही मानवनिर्मित सौंदर्यकृतींनीसुद्धा मला थक्क केले. यात विजयदुर्ग, पुणे-सासवड रस्त्यावरची जाधव गढी, भंडारदराचे अमृतेश्वर मंदिर, साताऱ्याजवळचे कित्येक हजार शंकराच्या पिंडी कोरलेले पाटेश्वर अशी किती तरी ठिकाणे सांगता येतील. पण मनापासून भावलेलं आणि खरंच थक्क करून सोडणारं मला आवडलेलं ठिकाण म्हणजे कोल्हापूरच्या अलीकडे इचलकरंजीकडे जाताना पर्यटकांची आतुरतेने वाट बघत उभं राहिलेलं खिद्रापूर गावातलं शंकराचं मंदिर. अतिशय रेखीव कोरीव काम, मंदिरासमोरचा गोलाकार रंगमंच त्यावरच्या देवतांच्या मूर्ती, सुंदर नक्षीकाम केलेले खांब आणि १०४ गजशिल्पांनी संपूर्णपणे वेढलेले असे ते मंदिर, केवळ अप्रतिम!मानवनिर्मित कलाकृतीचा अजून एक चमत्कार म्हणजे जुन्नरजवळचा ‘नाणेघाट’. हा संपूर्ण घाट दगड रचून बनवलेला असा मानवनिर्मित घाट आहे. शिवाजी महाराजांच्या काळातला हा घाट एका व्यापाऱ्याने मजुरांकरवी बांधून घेतला. हा घाट घाटमाथ्यावरून थेट तळकोकणात उतरतो. विश्रांतीसाठी मध्ये मध्ये असलेल्या गुहा, घोड्यांना पाणी मिळण्यासाठी वाटेत ठेवलेली मोठी दगडी रांजणं, मशाली लावायला केलेल्या भिंतीतील खाचा, घोंघावणारा वारा, उंचच्या उंच असे सह्याद्रीचे दोन सुळके आणि त्यामध्ये लांबून एखाद्या चिरेसारखा वाटणारा हा घाट अंगावर शहारा आणतोच पण नकळतपणे आपल्याला त्या काळातही घेऊन जातो.अशा वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देताना जशी निसर्गाची रूपं बघितली तशीच तिथल्या मानवी संस्कृतीचीही वेगवेगळी रूपं बघायला मिळाली, माझ्या नशिबाने मला आदिवासी संस्कृती जवळून पाहण्याचा योग आला तो ठाणे जिल्ह्याजवळचा विक्रमगड या ठिकाणी एका आदिवासी पाड्यात. तेथे मी संपूर्ण दिवस काढला. एका आदिवासी बाईच्या घरात गेले तर इतके स्वच्छ घर आणि एखाद्या वास्तुशास्त्राच्या रचनेप्रमाणे वापरला गेलेला घराचा कोपरा न् कोपरा बघून मी थक्क झाले. गाईगुरे घरातच बांधलेली, पण त्यांचा वास नाही की कुठे पसारा नाही. छोटीशी शिडी लावून वरच्या बाजूला केलेला माळा आणि धान्य साठवण्यासाठी त्यात केलेले कप्पे हे सर्व बघितलं आणि तिच्या स्वयंपाकघरामध्ये तिच्याबरोबर भाकरीसुद्धा भाजली. नंतर एकत्र जेवायला बसलो. दिवसभर फिरून रात्री दमलेल्या आणि दिवसभराचे कष्ट विसरावेत म्हणून शेकोटी पेटवून फेर धरणाऱ्या त्या आदिवासी लोकांबरोबर मी ‘तारपा’ नृत्य केले आणि दिवसभर एका वेगळ्याच समाजात, संस्कृतीत जगल्याचा आनंद आणि आठवणी मनाशी बांधून मी त्यांचा निरोप घेतला.भटकंतीच्या दरम्यान असे अनुभवलेले अनेक छोटे मोठे क्षण आहेत. जे खूप काही देवून गेले, खूप काही शिकवून गेले. अगदी कात्रज सर्पोद्यानात ‘साप’ हातात घेण्यापासून ते ‘जव्हार’ जवळच्या काळमांडवी ह्या ठिकाणी केवळ एक पाऊल कसेबसे मावेल आणि जरा घसरले तर थेट दरीच एवढ्या वाटेवरून चालण्यापर्यंत डोंगर किल्ले, धबधबे, अभयारण्ये, समुद्र, लेणी, मंदिरे, संग्रहालये अगदी निगोजची रांजणकुंडे ते उन्हिवरेच्या गरम पाण्याच्या झऱ्यापर्यंत सर्व निसर्गाचे चमत्कार बघितले. शिल्पकार करमरकरांच्या कलाकृती बघितल्या. नगरचे-कांबळे, पुण्याचे-कापूरकर ह्या शिल्पकारांना भेटले. अगदी औरंगाबादच्या तारापानवाल्याबरोबर पानं लावण्यापासून ते नाशिकच्या कोंडाजी-मकाजी चिवडावाल्याबरोबर चिवडा बनविण्यापर्यंत. लोणावळ्यज्ञच्या मगनलाला चिक्कीचे रहस्य जाणून घेण्यापासून ते सातारच्या कंदी पेढ्यांचा स्वाद घेण्यापर्यंत सर्व अनुभवले. औंध संस्थानच्या संग्रहालयाला भेट देताना अतिशय पुरातन अशा वस्तूंचा बहुमोल साठा बघायला मिळाला तर पुण्याच्या सिडॅकमध्ये अतिप्रगत असा जगातला सर्वात मोठा ‘परम’ हा महासंगणकही बघायला मिळाला.आज मी जेव्हा ‘मी आणि माझी भटकंती’ असा विचार करते, तेव्हा भटकंतीने मला काय दिलं, असा प्रश्न मनात येतंच नाही. कारण मला जे काही वाटलं होतं त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त असं वेगवेगळ्या स्तरावर मी अनुभवलंय आणि अनुभवानेच जीवन समृद्ध होतं असं म्हणतात. शेवटी जीवन तरी काय आहे? आनंद आणि समाधान यांच्या शोधात केलेली एक भटकंतीच आहे. कधी खाचखळग्यातून तर कधी थेट द्रुतगती मार्गावरून नेणारी अशी भटकंती... हो ना?

(लेखिका प्रसिद्ध नृत्यांगना आहेत.)