मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) आयसीसी टी-२० विश्वचषकावेळी घेण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताची ३ कोटी ६० लाखांची थकबाकी प्रलंबित आहे. या स्पर्धेला चार महिने होऊनदेखील ही रक्कम एमसीएने भरलेली नाही. माहिती अधिकारात ही माहिती समोर आली. पोलिसांनी एमसीएकडे शुल्क वसुलीसाठी पत्र पाठविले. एमसीएने मात्र डोळेझाक केली आहे. मार्च २०१६ मध्ये या स्पर्धा झाल्या होत्या. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलिसांकडे शुल्काची माहिती मागितली होती. त्यात टी-२० स्पर्धेंतर्गत १० मार्च ते ३१ मार्च या कालावधीत एकूण सहा सामने झाले होते. प्रत्येक सामान्यामागे ६० लाख या प्रमाणे एकूण ३ कोटी ६० लाखांचे बिल झाले. मात्र, ते भरण्यासाठी पोलिसांकडून एकही पत्र एमसीएकडे पाठविण्यात आलेले नव्हते. २४ जूनला उपायुक्त (अभियान) अशोक दुधे यांनी सशस्त्र दलाच्या उपायुक्तांना लेखी पत्र पाठवून बंदोबस्ताची रक्कम वसूल करण्याची सूचना केली.बंदोबस्त शुल्क प्रलंबित असताना, दंड, व्याज आकारण्यात आलेला नाही. यापूर्वी २०११ मध्ये चार सामन्याचे शुल्क २ कोटी ४९ हजार ८८५ रुपये एमसीएने अदा केले असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
‘एमसीए’कडे पोलिसांची ३.६० कोटी थकबाकी
By admin | Updated: July 20, 2016 07:11 IST