शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
2
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
4
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
5
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
6
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!
7
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
8
ICC Womens World Cup 2025 : युवराज सिंगच्या साक्षीनं हरमनप्रीत कौरनं दिला शब्द; आम्ही...
9
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
10
‘काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व, कार्यकर्त्यांचा अभाव,’’ हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला   
11
AUS vs SA: एकेकाळी 'मुंबई इंडियन्स'कडून खेळणाऱ्या फलंदाजांने मोडला सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम
12
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
13
आई दुसऱ्यांकडे काम करायची, वडील विटा उचलायचे; २२ व्या वर्षी लेक देशातील सर्वात तरुण IPS
14
VIDEO: महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
15
Viral Video: मध्यरात्री शौचालयासाठी बाहेर पडला, अचानक समोर दिसला बिबट्या, पहारेकरीसोबत असं घडलं की...
16
‘माझी पत्नी बाहेरच्या लोकांना घरी बोलावते’, व्हिडीओमध्ये सांगून पतीनं उचललं भयानक पाऊल...  
17
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
18
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
19
Gold Silver Price 11 August: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
20
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  

साखर उद्योगाची गोडी वाढविणारा हुतात्मा पॅटर्न

By admin | Updated: November 6, 2016 01:00 IST

-- रविवार विशेष

कृषी प्रक्रिया उद्योगातील सर्वांत यशस्वी व फायदेशीर साखर उद्योग आहे. तो शहाणपणाने चालविला तर पैसाच पैसा आहे, अशी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांची धारणा होती. उसाला चांगला दर देता येतो, कामगारांना योग्य वेतन देता येते आणि साखर कारखान्याचे आर्थिक व्यवस्थापनही उत्तम सांभाळता येते याचे अनेक प्रयोग यांनी यशस्वीपणे करून दाखविले आहेत.दिवाळी संपली, गुलाबी थंडीची चाहूल लागली की, पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणी, ओढणी आणि गाळप यांचा हंगाम सुरू होतो. दरकोसाला भाषा बदलते म्हणतात, तसे कर्नाटक सीमेपासून खानदेशाच्या सीमेपर्यंत दर कोसाला साखर कारखाने आहेत. १९२६ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूरला पहिला खासगी क्षेत्रातील साखर कारखाना सुरू झाला. त्यानंतर केवळ सहाच वर्षांत १९३२ ला कोल्हापूरला पंचगंगेच्या तीरावर छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुढाकाराने दुसरा कारखाना सुरू झाला. स्वातंत्र्यानंतर सहकारी साखर कारखान्यांची चळवळच उभी राहिली. त्याला राजकीय आयामही लाभले. उद्योग आणि राजकारण यांच्या द्वंद्वात दोन्हींचे आतोनात नुकसान होत महाराष्ट्रातील साखर उद्योगाने नव्वदी गाठली आहे. आपल्या गाठीशी पुरेसा अनुभव जमा झालेला आहे. तरीदेखील हा शेतकऱ्यांच्या कल्याणकारी उद्योग स्थिरावत नाही. दर दोन-तीन दशकाने त्याची कूस बदलत राहते. गेल्या दोन दशकांत पुन्हा एकदा हा साखर उद्योग खासगी क्षेत्राकडे वर्ग होत चालला आहे. त्याच्या बरोबरीने शेतकरी हा केंद्रबिंदूही हरवला जातो की काय अशी शंकेची पाल मनात चुकचुकते आहे. कारण खासगी क्षेत्रातून शेतकऱ्यांच्या मालकीच्या सहकारातून प्रवास करीत आता ही उसाची गाडी खासगी अड्ड्यावर जाऊन थांबू लागली आहे. तिला थांबा मिळणार की, शेतकऱ्यांना कोणी वाली नाही म्हणून हा उद्योग असाच ऊन पावसाळे पाहत राहणार? याची चर्चा नव्याने होण्याची गरज आहे.नव्वद वर्षांच्या या साखर उद्योगात उसाला रास्त भाव मिळाला पाहिजे. या चळवळीनेसुद्धा चौथे दशक गाठले आहे. शरद जोशी यांनी अंकुर पेरले आणि त्याचा आता वृक्ष झाला आहे, त्याच्या उशाला सावली मिळणार याची शेतकऱ्यांना खात्री वाटू लागली आहे. मात्र, या संपूर्ण प्रवासात एक ठिकाण वेगळे आहे. त्याच्या वेगळेपणात अनेक प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत. साखर कारखानदारी, ऊसकरी शेतकरी आणि त्याचे राजकीय अर्थशास्त्र यावर कोणीही शहरी महाभाग तिरस्काराने बोलू दे, पण सहकार चळवळीची मूळ प्रेरणा ही समाजहित आणि शेतकरी हा केंद्रबिंदू होता, याची प्रचिती ही उत्तरे तपासताना येते. त्याची उत्तरे देणारा हुतात्मा पॅटर्न आहे आणि त्याचा प्रयोग करणारे कृतिशील साखर कारखाना संस्थापक क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी होते. त्यांनी असंख्य प्रयोग केले आहेत. त्यात आजच्या साखर उद्योग, शेतकरी, कामगार आणि राज्यकर्ते यांच्यासमोरील प्रश्नांची उत्तरे आहेत. ते काय प्रयोग होते? त्यांची स्पष्ट साधना होती की, कृषी औद्योगिक क्रांतीतून कृषी प्रक्रिया उद्योगातील सर्वांत यशस्वी तसेच फायदेशीर साखर उद्योग आहे. तो शहाणपणाने चालविला तर पैसाच पैसा आहे, अशी त्यांची धारणाच होती. उसाला चांगला दर देता येतो, कामगारांना योग्य वेतन देता येते आणि साखर कारखान्याचे आर्थिक व्यवस्थापनही उत्तम सांभाळता येते याचे अनेक प्रयोग त्यांनी यशस्वीपणे करून दाखविले आहेत.सध्या उसाला योग्य भाव देणे शक्य होत नाही. कामगारांना पगारवाढ देणे परवडत नाही, असे अनेकजण म्हणतात. त्याचवेळी असंख्य सहकारी साखर कारखाने गेल्या काही वर्षांत बंद पडलेत किंवा खासगी व्यक्तींना विकले किंवा चालवायला दिले आहेत. अशा पार्श्वभूमीवर हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याचा हा प्रयोग काय दर्शवितो आहे? सध्याचे दोलायमान अवस्थेतील साखरेचे अर्थकारण असतानाही साखर कारखानदारांच्या विरोधात लढणाऱ्या ऊस परिषदेत हुतात्मा साखर कारखान्याचा गौरव केला जातो की त्यांनी एफआरपीपेक्षा गतवर्षी अधिकचा भाव दिला. त्याचवेळी राज्य सरकार, कामगार संघटना आणि साखर कारखाना संघाच्या त्रिस्तरीय वेतन मंडळाने निश्चित केलेली वेतनवाढही हुतात्मा साखर कारखान्याने सर्वप्रथम दिली आणि त्या कारखान्याचा एकही कामगार कर्मचारी आज दरमहा २४ हजार रुपयांपेक्षा कमी वेतन घेत नाही. वाहनचालकास सरासरी रु. ३२ हजार रुपये पगार आहे. शिवाय या कामगारांना वार्षिक ४० टक्के बोनस अदा केला जात आहे. गतवर्षी एफआरपी देता येणे शक्य नाही असे सांगितले जात असताना त्याहून अधिक पैसे दिले आणि कामगारांना वेतनवाढही सर्वप्रथम दिली.हुतात्मा सहकारी साखर कारखान्याने राज्य तसेच देशपातळीवर जवळपास पन्नास पुरस्कार पटकाविले आहेत. त्यांनी एक नव्हे असंख्य प्रयोग करून ही साखर कारखानदारी शेतकऱ्यांच्या हितासाठी कशी चालविता येते याचा आदर्श घालून दिला आहे. राज्यात साखर उताऱ्यात नंबर, दर देण्यात नंबर, वेतनवाढ देण्यात पहिला नंबर असे असेल तर आणखी काय हवे? या सर्वांची सुरुवात क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी केली आहे. साखरेचा उतारा उत्तम राखणे, हा धंदा किफायतशीर ठरण्यासाठीचा पहिला मंत्र त्यांनी जाणला. यासाठी उत्तम दर्जाचा ऊस, नियमानुसार तोडणी, कोवळ्या उसाची तोड न करणे, उसाची तोडणी करताना पालापाचोळा येणार नाही याचीही दक्षता घेण्यात आली. तोडलेला ऊस किमान बारा तासांच्या आत गाळला नाही तर त्याची रिकव्हरी एक टक्क्याने कमी येते म्हणजे दर टनामागे दहा किलो साखरेचे उत्पादन घटते. यासाठी उसाची तोड केल्यानंतर लवकरात लवकर गाळप करून उतारा वाढविण्याचे तंत्र विकसित केले. रात्रभर ऊस तोडणी केली तर तो चार तासांच्या आत गाळता येईल, त्यासाठी रात्रपाळी सुरू केली. या रात्रपाळीतील वाहनाला फडातून सुटल्यावर थेट काट्यावर जाऊन उभे राहण्याची व्यवस्था केली. अशा तोडलेल्या उताराचा उतारा चौदापर्यंत जातो. मग रात्रपाळीत ऊस तोडणाऱ्या तोडणी मजुराची सोय करायला हवी. तो दररोजचा रात्री ऊस तोडणार असेल तर टिकला पाहिजे. प्रत्येक मजुराला स्वेटर, बूट, त्यांच्या मुलांच्या संगोपणाची सोय, त्यांच्या जेवणाची आणि शिक्षणाची सोय करणे क्रमप्राप्त आहे. प्रत्येक मजुराला स्वेटर आणि बूट देणारा एकमेव कारखाना असेल. शिवाय रात्रपाळीत काम केल्याबद्दल पाच ते दहा टक्के वेतन अधिक दिले जाते. रात्रीत फडात दिसायला हवे म्हणून जनरेटरची सोय, मजुरांना चहाची सोय, रात्रपाळीत असो किंवा इतरवेळीही मजुराला कोयता लागला, गाडीवरून पडला, आजारी पडला तर थेट भरती मिरजेतील गायकवाड किंवा डॉ. भारती यांच्या हॉस्पिटलमध्येच करायचे. यासाठी एक स्वतंत्र जीप ठेवलेली असते. त्या आजारी माणसाला वाळव्यात दररोज सकाळी नऊ आणि सायंकाळी पाच वाजता स्वतंत्र गाडीने ताज्या जेवणाचा डबा पोहोच केला जातो. एकदा एका गाडीवानाचा फडातून गाडी हाकताना तोल गेला तो सरळ बैलाच्या पायात पडला. बैलही बिथरला. त्यात त्याचा नालाबंद पाय गाडीवान मजुराच्या कानावरच पडला. तो रक्तबंबाळ झाला. चोवीस तास सेवा देणाऱ्या कंट्रोलरूमच्या जीपपर्यंत माहिती पोहोचली. कर्मचारी कामावर होता. त्याचे नाव विश्वास मुळीक. त्याने तातडीने फड गाठला. गाडीवानास जीपमध्ये घातले आणि मिशन हॉस्पिटल गाठले. डॉ. मीना पडिया (डॉ. गायकवाड यांच्या स्नुषा) यांनी तपासणी केली. रक्ताने अंग माखलेले होते; पण तुटलेला कान कोठे आहे? या डॉक्टरांच्या प्रश्नाने विश्वास मुळीक हादरलेच. कानच तुटलाय व्हय! बहुधा फडात असेल म्हणून मिरजेहून चाळीस किलोमीटर जीपने परत आला. घटनास्थळावर तुटलेला कान होता. पुडीत बांधला. मिशन हॉस्पिटल गाठले. डॉक्टरांच्या हातात तुटलेला कान ठेवला. डॉक्टरांनी तातडीने आॅपरेशन करून कान जोडला. ही वार्ता दुसऱ्या दिवशी जेवणाची गाडी निघताना नागनाथअण्णा यांना कळाली. त्यांनी विश्वासला बोलावून मिठी मारून अभिनंदन केले.साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांशिवाय कामगार आणि ज्या धरणांमुळे पाणी मिळून उसाची शेती उभारली त्याकडे कधी फारसे लक्षच दिले नाही. हुतात्मा पॅटर्नने तोही आदर्श घालून दिला. १९९० पर्यंत राज्यातील साखर कामगारांना किमान वेतनाची तरतूद असली तरी अंमलबजावणी नव्हती. नागनाथअण्णा यांनी १९९० मध्ये राज्यभरातील साखर कामगारांना आणि कामगार संघटनांना एकत्र केले. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे निफाड तालुका सहकारी साखर कारखान्याच्या मैदानावर दोन दिवसांची भव्य साखर कामगार परिषद घेतली. त्या कारखान्याचे अध्यक्ष मालोजीराव मोगल यांनी मदत केली. (मोगल तीनवेळा आमदार होते. त्यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले.) त्यावेळी सरकारने जाहीर केलेली वेतनश्रेणी सर्वप्रथम हुतात्मा साखर कारखान्याने लागू केली होती. ज्या धरणांच्या पाण्याने ऊस शेती पिकते; पण ती उभारताना जे विस्थापित झाले त्यांना आपण विकासात भागीदार करून घेतले पाहिजे. त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारी पातळीवर लढले पाहिजे. त्यांच्या चळवळीला आर्थिक मदत आपणच केली पाहिजे म्हणून लाखो रुपये बाजूला काढून धररग्रस्तांना याच हुतात्मा पॅटर्नने बळ दिले. कारखाना सुरू झाल्यापासून पहिल्या काही वर्षांत कर्जाचा एकही हप्ता एक दिवसही उशिरा परत केला नाही. जसे हप्ते होते तसे सर्व हप्ते वेळेवर परत करताच आनंदोत्सव साजरा करण्यात आला. प्रत्येक सभासद शेतकऱ्याच्या घरात जिलेबी पोहोच केली.एकदा ऊस तोडणी मजुरांच्या झोपड्यांना आग लागली. अनेक जनावरे दगावली. दरवर्षी अशा झोपड्या उभारणीसाठी लाखो रुपये खर्च होतो. नव्या हंगामात पुन्हा नव्या झोपड्या उभ्या करण्यात येतात. त्याऐवजी छोटी-छोटी पक्की घरेच बांधण्याचा निर्णय केला आणि एका हंगामात ४५ लाख रुपये खर्च करून मजुरांसाठी पक्की घरेच कायमची झाली. उसाची लावणीपासून तोडणीपर्यंत आणि त्याची साखर करेपर्यंत काटकसरी हा उद्योग चालविण्याने चांगला दर देता येतो याचा हा प्रयोग आहे. खरे तर हुतात्मा कारखान्याने दराची स्पर्धा लावली. या सर्वांसाठी वार्षिक नियोजन ठरलेले आहे. दरवर्षी मुहूर्त वगैरे काढण्याची गरज नाही. गांधी जयंतीला सूर्याेदयाला कारखान्याचा बॉयलर प्रदीपन समारंभ न चुकता होतो. त्यात खंड नाही. ऊस तोडताना गाडी फडात अडकली किंवा ट्रक्टर पंक्चर झाला तर शेतकरी व तोडकऱ्यांनी त्यांच्याशी कुस्ती करीत बसायचे नाही. कारखान्यांच्या कंट्रोलर नंबरवर वर्दी द्यायची. तातडीने जीप येते. सोबत सर्व साधने आणि तंत्रज्ञ असतो. गाडीचे चाक बदलतात. ट्रॅक्टर अडकला असेल तर काढून देतात. तोडलेला ऊस वाहन अडकले म्हणून जाग्यावर थांबता कामा नये. उतारा कमी होतो. वाहनाचा खोळंबा होतो. वाहन ऊस उतरून परत न आल्याने तोडलेला ऊस फडात वाळत पडतो. वाळत असलेला ऊस उचलला नाही म्हणून फडकरी बसून राहतो. त्याची मजुरी बुडते. यासाठी हा सर्व प्रयोग आहे. शिवाय शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होतेच यासाठी संपूर्ण हंगाम चालू असताना कंट्रोलरूममध्ये कर्मचारी व तंत्रज्ञानासह जीप तयार असते. या सर्वांचा परिणाम उतारा उत्तम राहतो. साखर कारखाना चालू असताना अध्यक्षांनी कारखान्यावरच गेस्ट हाऊसवर झोपायला हवे, ही अटच आहे. रात्री-अपरात्री कारखाना बंद पडू नये, घात-अपघात झाल्यास तातडीने अध्यक्षांच्या मदतीनेच मदतकार्य घ्यावे. शिवाय कारखान्याच्या कार्यकारी संचालकाने हंगाम काळात कारखाना कार्यस्थळावरच राहण्याची सक्ती आहे. अशा असंख्य प्रयोगाने हुतात्मा पॅटर्न तयार झाला आहे. त्यामुळे उसाला योग्य भाव, कारखान्याने अर्थकारण सांभाळणे आणि कर्मचारी, मजूर, वाहतूकदार यांना सर्वोत्तम मोबदला देता येतो. हे सप्रमाण सिद्ध करून दाखविले आहे. उसाची पहिली उचल, त्यानंतर दुसरी मार्चपर्यंत आणि जूनमध्ये रोहिणी नक्षत्राबरोबरच पाच वर्षांपूर्वी घेतलेल्या ठेवीची परतफेड, चार वर्षांतील ठेवीवरचे व्याज, आदी परत करण्याची मुदत ठरलेली आहे आणि कारखाना सुरू होण्यापूर्वी अंतिम दर ठरवून उर्वरित रक्कम अदा केली जाते. शेतकऱ्यांना वर्षातून चारवेळा पैसे दिले जातात. दरवर्षी घेतलेल्या पाच वर्षांच्या मुदतीच्या ठेवी, दरवर्षी परत केल्या जातात. त्यात खंड नाही. शिवाय उर्वरित ठेवीचे व्याजही परत केले जाते यातही खंड नाही. म्हणजे कर्जाचा हप्ता वेळेवर परत, ठेवी वेळेवर, उसाचे पैसे वेळेवर, कामगारांचा पगार वेळेवर, बोनस चाळीस टक्के वेळेवर असे साखर कारखानदारीचे मॉडेल हुतात्मा आहे. सध्याच्या सहकारी साखर चळवळीच्या अवस्थेत ही शिस्त वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळेच येत्या वर्षातही एफआरपीपेक्षा सर्वाधिक दर देण्याची तयारी करून हुतात्मा साखर कारखाना गळीत हंगामास तयार आहे. या कारखान्याचे संस्थापक नागनाथअण्णा नायकवडी यांनी साखर धंद्याची गोडी शेतकरी आणि कामगारांमध्ये वाढविली आहे. त्यांना प्रणाम आणि शेतकऱ्यांच्या जिद्दीला सलाम!--- वसंत भोसले