मुंबई : ठाणे महापालिका व त्यालगतच्या सहा नगरपालिकांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता शिळफाटा येथील वन खात्याची व वीज निर्मिती प्रकल्पाकरिता तळोजा येथील जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.कदम म्हणाले की, ठाणे महापालिका आयुक्त व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्या बैठकीत शिळफाटा येथील जमीन ठाणे महापालिकेला कचरा टाकण्याकरिता दिली जाणार आहे. याकरिता महापालिकेने पैसे भरले आहेत. पुढील दोन वर्षे तेथे कचरा टाकता येईल. याखेरीज त्याच जवळील १८ एकर वन खात्याची जमीन महापालिकेने मागितली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. तळोजा येथील जमिनीवर कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा ठाणे महापालिकेचा प्रस्ताव सचिव स्तरावर विचाराधिन आहे. हा प्रस्ताव मान्य झाला तर ठाणे महापालिकेसह सहा नगरपालिकांच्या कचऱ्याची समस्या संपुष्टात येईल. विधिमंडळ अधिवेशनानंतर सर्व नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना आपण बोलावून घेणार असून त्यांना २५ टक्के निधी घनकचरा व्यवस्थापन व जलप्रदूषण रोखण्याकरिता ठेवण्याचे आदेश दिले जातील. तसे न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील. (विशेष प्रतिनिधी)
नगरपालिकांच्या कचऱ्याचा प्रश्न मार्गी
By admin | Updated: April 6, 2015 23:14 IST