मुंबई : निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न, वेतन वाढ, सुट्ट्यांचा प्रश्न अशा प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्या सरकार पूर्ण करेल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मार्ड संघटनेला १२ जून रोजी दिले होते. हे लेखी स्वरूपात द्या, अशी मागणी मार्डने केली होती. परंतु, या घटनेला १० दिवस उलटूनही बैठकीचा इतिवृत्तान्त मार्ड संघटनेला मिळाला नसल्याची माहिती मध्यवर्ती मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी दिली. निवासी डॉक्टर नेहमीच रुग्णांच्या सेवेसाठी तप्तर असतात. रुग्णाची प्रकृती चांगली व्हावी, यासाठीच डॉक्टर रुग्णावर उपचार करीत असतात. काहीवेळा रुग्णावर उपचार करत असतानाच त्याचा मृत्यू होतो. या वेळी रुग्णाचे संतप्त नातेवाईक हे परिस्थिती समजून न घेता निवासी डॉक्टरांवर हल्ले करतात. आत्तापर्यंत अनेक निवासी डॉक्टरांवर हल्ले झाले आहेत. याचबरोबरीने नागपूर येथे विभाग प्रमुखाकडून निवासी डॉक्टरांचा छळ होत होता. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न सोडवण्यात यावा आणि डॉक्टर संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी, अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत. तावडे यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत आमच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाले होते. त्यानंतर १० दिवस उलटूनही सरकारने कोणतेही पाऊल उचलेले नाही. लेखी स्वरूपात कोणतेही आश्वासन मिळालेले नाही.
मार्डला लेखी आश्वासन मिळालेच नाही
By admin | Updated: June 23, 2015 02:48 IST