-सुधीर महाजन
मराठवाड्यातील निकालांचे वैशिष्ट्य म्हणजे अशोक चव्हाण आणि चंद्रकांत खैरे या दोन दिग्गजांचा पराभव. तसेच पहिल्यांदाच मराठवाड्यातून काँग्रेसचा एकही खासदार नाही. मोदी लाटेत नांदेडची जागा काँग्रेसने गमावणे आश्चर्य नाही; पण औरंगाबादसारखी शिवसेनेची महत्त्वाची जागा एमआयएमने हिसकावणे ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे. हा पराभव सेनेच्या जिव्हारी लागणारा आहे. कारण मुंबईबाहेर शिवसेनेच्या राजकारणाची मुहूर्तमेढ औरंगाबादेतच रोवली गेली होती.
गेल्या निवडणुकीत मोदी लाट असतानाही नांदेडची जागा काँग्रेसने राखली होती; परंतु यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय प्रयोगाने काँग्रेसच्या राजकारणाचा ताळेबंदच बाद ठरवला. त्याचा फायदा भाजपने उठवला. हे चित्र महाराष्ट्रभर दिसले. धर्मनिरपेक्ष मतांच्या विभाजनाचा फटका काँग्रेसला बसला. अशोक चव्हाणांचा पराभव झाला असला तरी त्यांना साडेचार लाख मते मिळाली. या गोष्टीकडे कानाडोळा करता येणार नाही. यावेळी पहिल्यांदाच भाजप आणि वंचित आघाडी या दोन्ही पक्षांना मिळालेली मते ही पक्षाकडे न पाहता नरेंद्र मोदी आणि प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाहून मतदान झाले. या ठिकाणी पक्षाचा उमेदवार दुय्यम ठरला. गेल्या निवडणुकीत ‘अशोकराव पाहिजेत’ या मुद्यावर मतदान झाले होते. यावेळी हा मुद्या गायब होता. ‘वंचित’च्या उदयामुळे काँग्रेसच्या परंपरागत मतदाराचे विभाजन ही बाब निर्णायक ठरली.
औरंगाबादेत खैरेंचा पराभव अपेक्षाभंग करणारा अजिबात नव्हता. जनतेला गृहीत धरण्याची प्रवृत्ती हे पराभवाचे मूळ कारण आहे. गेल्या वर्षभरात कचरा, पाणी, रस्ते या समस्यांनी औरंगाबादचे नागरिक त्रस्त आहेत आणि या समस्यांवर अजुनही उपाय योजले नाहीत. शिवाय महानगरपालिकेतील अनागोंदी या सगळ्यांचा फटका खैरेंना बसला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आळसावलेली शिवसेना. त्याचा परिणाम झालाच अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी खैरेंच्या मतांचे विभाजन झाले. एम.आय.एम.चे इम्तियाज जलील यांनी औरंगाबादेतून विधानसभेची निवडणूक जिंकली होती. त्यांच्या औरंगाबाद मध्य मतदारसंघातच शिवसेनेचा बालेकिल्ला समजली जाणारी गुलमंडी येथे. तेथेच त्यांनी सेनेचा पराभव केला; पण या पराभवातून सेनेने धडा घेतला नाही.