मुंबई : महापालिका क्षेत्रातील पदपथ, रस्ते, शाळा, उद्याने तसेच स्मशानभूमी इत्यादी ठिकाणी चित्रपट किंवा दूरचित्रवाणी मालिकांच्या चित्रीकरणासाठी घसघशीत सवलत जाहीर केली आहे. शिवाय चित्रिकरणासाठीची परवानगी प्रक्रिया देखील सोपी व सुलभ केली आहे. सवलतीतील शुल्क देखील पालिकेने जाहीर केले आहेत. यात सर्वाधिक सवलत ही मराठी चित्रपट व मराठी दूरचित्रवाणी मालिकांसाठी देण्यात आली आहे. चित्रीकरण परवानगीसाठी आता निश्चित स्वरुपातील तीन पानी अर्ज बनवला आहे. हा अर्ज भरणे अत्यंत सहज, सोपे आहे. त्यात संबंधित शुल्क, अटी देखील नमूद करण्यात आल्या आहेत. हा अर्ज आॅनलाईन पाठवण्याचीही सुविधा देण्यात येणार आहे. चित्रीकरणाच्या परवानगीसाठी या पूर्वी ज्या विभागातील रस्ते, पदपथ, उद्याने आहेत, त्या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागत असे. महापालिका शाळांबाबत शिक्षण अधिकारी तर स्मशानभूमींबाबत उप-आरोग्य अधिकारी परवानगी देत असत. पण आता हे सगळे रद्द करण्यात आले आहे. नव्या परिपत्रकानुसार रस्ते, शाळा व स्मशानभूमीबाबत परवानगीसाठी संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे थेट अर्ज करता येईल. याबाबत आॅनलाईन सुविधाही लवकरच उपलब्ध करुन दिली जाईल. (प्रतिनिधी)
मराठी चित्रपट, मालिकांसाठी महापालिका उदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2015 02:35 IST