शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
2
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
3
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
4
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
5
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
6
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
7
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
8
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
9
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
10
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
11
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
12
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
13
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
14
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
15
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
16
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
17
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
18
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
19
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
20
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
Daily Top 2Weekly Top 5

Marathi Bhasha Din : चीनमधील मराठीचं 'कोटणीस कनेक्शन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 08:04 IST

मराठी माणूस आणि चिनी माणूस यामध्ये तसं काही साम्य नाही. म्हणजे स्वभावधर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा वगैरेंमध्ये काहीही समान दुवा नाही.

- पुष्कर सामंत

मराठी माणूस आणि चिनी माणूस यामध्ये तसं काही साम्य नाही. म्हणजे स्वभावधर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा वगैरेंमध्ये काहीही समान दुवा नाही. पाश्चिमात्य देशांमध्ये किंवा अगदी झांबियासारख्या देशातही मराठी मंडळ वगैरे आहे. पण चीनमध्ये महाराष्ट्र मंडळ किंवा मराठी मंडळ नाही. बाकी अनेक देशांमध्ये २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मंडळांतर्फे काही कार्यक्रम आयोजित केले जातात. स्थानिक कलाकार गाणी, नाच, नाटुकल्या वगैरे सादर करतात. पण चीनमध्ये सगळा मामला थंड असतो. रोजच्या प्रमाणे हा दिवसही उगवतो आणि मावळतो.

खरंतर महाराष्ट्र आणि चीन यांच्यात नाळ जोडणारं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. द्वारकानाथ कोटणीस. १९३८च्या सुमारास दुसऱ्या सिनो-जपानी युद्धामध्ये वैद्यकीय पथकासोबत गेलेले एकमेव मराठी डॉक्टर. वैद्यकीय सेवा करत असतानाच त्यांचे चीनमध्ये निधन झाले. पण डॉ. कोटणीस यांचे हे उपकार आजही चीन विसरलेला नाही. चीनच्या हपेई प्रांतामध्ये डॉ. कोटणीस यांची समाधीदेखील आहे. आजही चीनचे राष्ट्राध्यक्ष भारत भेटीवर असतील तर दूतावासातील समारंभासाठी डॉ. कोटणीस यांच्या नातेवाईकांना आमंत्रण असतं.

ही एक नाळ असूनही चीनमधल्या कुठल्याच प्रांतात किंवा शहरात मराठी भाषिकांची एकी किंवा संघटना नाही. चीनच्या विविध शहरांमध्ये थोडेथोडके मराठी भाषिक विखुरलेले आहेत. नोकरीनिमित्त, शिक्षणानिमित्त गेलेले मराठी भाषिक हे तिथे जाऊन भारतीय ही एकच ओळख टिकवून असतात. अर्थात ही ओळख चांगलीच आहे. पण डॉ. कोटणीस यांचं कार्य मनात ठेवून त्या मातीचा अभिमान बाळगणं मात्र चीनमधल्या कुठल्याही मराठी माणसाला शक्य झालेलं नाही. म्हणजे कुणी प्रयत्न केले नाहीत असे नसेल. पण प्रयत्न केल्याचंही ऐकिवात नाही. आपल्याकडच्या मराठी मुलांना डॉ. कोटणीसांचा विसर पडला आहे तसा चीनमधल्या आताच्या तरूणाईलाही पडला आहे. काळाच्या ओघात ते होणारच असं म्हणण्याइतकी ही साधी आणि सोपी घटना नाही. एरवी कुणाही सोम्यागोम्यांच्या जयंती-पुण्यतिथीला भर चौकात मंडप घालून धिंगाणा घालायला आपण कमी करत नाही. पण कसंय, मुळातच डॉ. कोटणीस यांना ग्लॅमर नाही. आणि त्यातही त्यांचं कार्य म्हणजे ते सीमेपलीकडे (आत्ताच्या) शत्रूराष्ट्रात केलेलं. त्यामुळे अशा माणसाचं उदात्तीकरण करायच्या भानगडीत कोण पडेल. 

मुद्दा उदात्तीकरणाचा नाही. मुद्दा आहे तो दोन भिन्न संस्कृतींना एकत्र आणण्याचा. कुठल्याही दोन संस्कृतींमध्ये जशी तफावत असते तसंच योगायोगाने काही साम्यही असतं. आता चिनी भाषेचं म्हणाल तर काही शब्द हे मराठी शब्दांसारखेच वाटतात. उदाहरणार्थ चिनी भाषेतला छा म्हणजे आपला चहा. किंवा तासुअन म्हणजे लसूण. मांजर म्हणजे मनीमाऊला माओ. यादी केली तर अनेक शब्द निघतील. सणांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर कंदील हा प्रकार दोन्ही संस्कृतींच्या मोठ्या सणाला आवर्जून दिसणारा प्रकार आहे. आपली दिवाळी आणि चिनी नवीन वर्ष किंवा स्प्रिंग फेस्टिव्हल हे दोन्ही मोठे सण कंदीलाविना अपूर्ण वाटतात. आपल्याकडे जसं पितरांना आदरांजली वाहण्यासाठी पितृपंधरवडा असतो तसाच काहीसा प्रकार चिनी नागरिकांमध्येही आहे. छिंगमिंग फेस्टिव्हल हा सण म्हणजे पूर्वजांचं पुण्यस्मरण करण्याचा दिवस असतो. आपल्याकडे पितरांसाठी पान वाढलं जातं. तर चीनमध्ये पितरांना नोटा जाळून थेट पैसे पाठवले जातात. नाट्यप्रकार घ्यायचा झाला तर चायनीज ओपेरा हा आपल्या संगीतनाटकाचाच भाऊ आहे. आलाप आणि ताना इथेही आहेत आणि तिथेही आहेत. 

खाद्यपदार्थांचा तर एक वेगळा लेखच होईल. मोदक आणि डम्पलिंग ही जुळी भावंडं आहेत. आपल्याकडच्या तिखट शेवया आणि नूडल्स यांच्यातही भावकीचं नातं आहे. ड्रॅगनबोट फेस्टिव्हलच्या दरम्यान बनवण्यात येणारं चूंगच आणि आपल्याकडच्या हळदीच्या पानातल्या पातोळ्या या बहिणी आहेत. चिंचेची आंबटगोड चटणी असते तशाच प्रकारची चटणी चीनमध्येही मिळते. आपल्याकडे जसा हिरव्या मिरचीचा ठेचा आहे तसा चीनमध्ये सचुआन (ज्याला शेजवान म्हटलं जातं) या लाल मिरचीचा ठेचाही जिभेवर जाळ काढतो.

मुद्दा काय तर भाषेचा प्रसार जर का करायचा असेल तर त्यासाठी एक दुवा लागतो. मराठी आणि चिनी माणसामध्ये तो दुवा आहे. फक्त त्याला जरा पॉलिशिंगची गरज आहे. इतर देशांमध्ये जितक्या जल्लोषात आणि दिखावेपणाने मराठी भाषा दिन साजरा होतो तितक्या तीव्रतेने नाही झाला तर आनंदच आहे. पण भाषेचा आणि संस्कृतीचा अस्सलपणा जपत हा दिन कधीतरी चीनमध्येही साजरा व्हावा हीच आजच्या दिनी इच्छा.

(लेखक चिनी भाषेचा अभ्यासक असून काही काळ चीनमध्ये वास्तव्यास होते.)

टॅग्स :Marathi Language Day 2018मराठी भाषा दिन 2018