मुंबई : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांतील निवडणुकीची आचारसंहिता संपताच २० जूननंतर केव्हाही मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये २० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विनायक मेटे यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली. या चर्चेत राणे म्हणाले की, समितीने साडेपाच लाख कुटुंबे आणि १८ लाखांहून अधिक लोकांचे सर्वेक्षण करून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला आणि २० टक्के आरक्षणाची शिफारस केली आहे. मात्र, त्याच वेळी ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लावण्यात आला नाही, असे राणे म्हणाले.आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांंसमोर ठेवून घिसाडघाईने निर्णय घेऊ नये. कायद्याच्या कसोटीवर टिकेल, असा परिपूर्ण निर्णय घ्यावा, अशी मागणी मेटे यांनी केली. तर, तामिळनाडूच्या धर्तीवर अभ्यास करून मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा, असे विरोधी पक्षनेते विनोद तावडे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
आचारसंहितेनंतर मराठा आरक्षण
By admin | Updated: June 14, 2014 04:21 IST