- सुरेश भटेवरा, नवी दिल्लीमहाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याप्रमाणेच देशाची राजधानी दिल्लीतही मराठा समाजाचा मराठा क्रांती मोर्चा शिस्तबद्ध व भव्य प्रमाणात आयोजित करण्याच्या इराद्याने दिल्लीत एक नियोजन बैठक सोमवारी झाली. मोर्चाची तारीख, वेळ, ठिकाण इत्यादी तपशील पुढल्या बैठकीत निश्चित करण्यात येणार आहे. संभवत: संसदेच्या अधिवेशन काळात या मोर्चाचे आयोजन व्हावे, असा बैठकीचा सूर आहे, असे बैठकीच्या संयोजकांनी सांगितले. महाराष्ट्र सदनात बैठकीसाठी परवानगी नाकारण्यात आल्यामुळे ही बैठक चौघुले पब्लिक स्कूलमध्ये पार पडली. बैठकीला मुख्यत्वे सर्वोच्च न्यायालय व दिल्ली हायकोर्टातील काही मान्यवर वकील, आयएएस, आयपीएस स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीत आलेले विद्यार्थी, गुरूग्राम व नोएडा भागात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेले काही व्यावसायिक, करोलबाग भागातले काही ज्वेलर्स, यांच्यासह हरयाणातील मराठा समाज बांधव, तसेच जम्मू व हिमाचल प्रदेशातून आलेल्या मराठा समाज बांधवांची उपस्थिती होती. बैठकीत साधारणत: २00 जणांचा सहभाग होता. बैठकीच्या संयोजनात प्रामुख्याने सांगली जिल्ह्यातून उत्तरेकडील राज्यात सोने-चांदीचा व्यवसाय करायला आलेल्या ज्वेलर्स बांधवांचा पुढाकार होता. महाराष्ट्राच्या धर्तीवर या मोर्चाला कोणाचेही नेतृत्व नसल्याने संयोजकांनी आपली नावे प्रसिद्ध करण्यास स्पष्ट नकार दिला.
दिल्लीतही धडकणार मराठा क्रांती मोर्चा!
By admin | Updated: September 27, 2016 02:22 IST