मुंबई : मंत्रालयात होणारी गर्दी कमी करण्यासाठी प्रवेश पद्धत सुलभ करण्याचा विचार नवे सरकार करीत असताना दुसरीकडे गर्दीचा ओघ वाढतच आहे. मंगळवारी तर कडेलोट झाला. तब्बल ५२ हजार अभ्यागतांनी एकच गर्दी केल्यामुळे मंत्रालयाचे व्यवस्थापन कोलमडून गेले. हौशे, नवशे आणि बघ्यांच्या गर्दीमुळे मंंत्रालयाला अक्षरश: जत्रेचे स्वरूप आले आहे.नवे सरकार सत्तेत आल्यापासून मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांचा ओघ वाढला आहे. या आधी मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी फार तर १२ ते १५ हजार लोक मंत्रालयात येत असत. आज त्याच्या पाचपट गर्दी होती. खरेतर अभ्यागतांना दुपारी २ नंतर मंत्रालयात प्रवेश दिला जातो; पण आज मंत्र्यांच्या दालनात सकाळपासूनच कार्यकर्त्यांची तोबा गर्दी होती. अनाहूत गर्दीने मंत्र्यांसह अधिकाऱ्यांचा कोंडमारा होण्याची वेळ आली. मंत्र्यांच्या दालनात तर पाय ठेवायलाही जागा नव्हती. अधिकारी-कर्मचाऱ्यांना काम करणेही अशक्य झाले. त्यामुळे मंत्र्यांचे पीए, पीएस, ओएसडी हैराण झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंड, महसूल मंत्री एकनाथ खडसे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे येणाऱ्या अभ्यागतांची संख्या अधिक असते. मंत्रालयात गर्दी करणाऱ्यांमध्ये हौशे-नवसे कार्यकर्त्यांचाच अधिक भरणा असतो. एकेका आमदारासोबत दहा-पंधरा कार्यकर्ते येत असतात. त्यापैकी एक-दोघांचेच तेवढे काम असते, बाकीचे सगळे बघ्ये! अशा बघ्यांमुळे मंत्रालयाला अक्षरश: जत्रेचे स्वरूप आले आहे. (विशेष प्रतिनिधी)
मंत्रालयात भरली हौशा-नवशांची जत्रा!
By admin | Updated: January 14, 2015 05:04 IST