ऑनलाइन लोकमत -
पणजी, दि. 09 - गोव्यात विनोद करणे सोपे आहे, परंतु दिल्लीत विनोद करायला मी घाबरतो असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर पणजीत महालक्ष्मी वाचनालयाच्या इमारतीच्या पायाभरणीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
पर्रीकर म्हणाले की दिल्लीत बोलताना एखादा हलका विनोद करणेही ते टाळतात, कारण तिथे विनोद करणे जोखमीचे असते. कारण त्या विनोदाचा कसा अन्वयार्थ काढून कोणता वाद निर्माण केला जाईल हे सांगता येत नाही. गोव्यात मात्र आपण निसंकोचपणे विनोद करू शकतो असे ते म्हणाले. २४ तास टीव्ही माध्यमे सक्रीय असल्या कारणाने सार्वजनिक जीवनात वावरताना प्रत्येक शब्द जपून वापरण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. त्याचे कारण सार्वजनिक जीवनात असलेला विनोदी वृत्तीचा अभाव असे ते सांगतात. मागे एकदा फोंडा येथील गोवा अभियांत्रिक महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या वसतीगृहाचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी स्वत: केलेल्या विनोदाची त्यांनी आठवण करून दिली. ‘शेवटी ३०-४० वर्षांनंतर आपले मुलींच्या वसतिगृहात जाण्याचे स्वप्न साकार झाले‘ असे त्यांनी म्हटले होते.