मुंबई : मद्यसम्राट विजय मल्ल्या हे भारतात परतण्यास तयार आहेत. पण, त्यांना स्वातंत्र्य आणि सुरक्षेची हमी हवी आहे. माल्ल्या यांनी स्टेट बँक आॅफ इंडियाला नवी सेटलमेंट आॅफर दिली आहे. युनायटेड ब्रुवरीज लिमिटेडच्या (यूबीएल) एका बैठकीला मल्ल्या यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने संबोधित केले. यात सहभागी एका संचालकांनी ही माहिती दिली.बँकाकडून डिफॉल्टर घोषित झालेले मल्ल्या हे सद्या ब्रिटनमध्ये आहेत. सक्तवसुली संचालनालय (ईडी) मल्ल्या यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.ही बैठक शुक्रवारी मुंबईत झाली. बोर्ड मेंबर किरण मजूमदार शॉ यांनी सांगितले की, मल्ल्या यांनी पूर्ण विश्वास व्यक्त केला की, ते लवकरच सर्व कर्ज परत करतील. सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मल्ल्या हे भारतात येऊ इच्छितात पण, त्यांना येथे सुरक्षा आणि स्वातंत्र्याची हमी हवी आहे. याबाबत थेट मल्ल्या यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. तथापि, हेनकेन या विदेशी कंपनीने मल्ल्या यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे, असे समजते. विविध बँकांनी मल्ल्या यांना ९००० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज दिलेले आहे. या कर्जवसुलीसाठी या बँका आता प्रयत्नशील आहेत. आपल्यावर चुकीचे आरोप लावण्यात आलेले आहेत. आपणास कर्ज परत करायचे आहे, असे मल्ल्या यांचे म्हणणे असल्याचेही एका बोर्ड मेंबरने सांगितले.
मल्ल्या परतण्यास तयार पण, स्वातंत्र्य, सुरक्षेची हवी आहे हमी
By admin | Updated: May 17, 2016 06:13 IST