मुंबई - महाराष्ट्रातील मालेगाव येथे २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल एनआयएच्या विशेष कोर्टाने सुनावला आहे. तब्बल १७ वर्षांनी कोर्टाने या प्रकरणातील सर्व ७ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यात मुख्य आरोपी प्रज्ञा ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांच्यासह ७ आरोपींना सोडण्यात आले. आता या निकालानंतर माजी एटीएस अधिकाऱ्याने मोठा दावा केला आहे. या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश मिळाले होते असं त्यांनी म्हटलं आहे.
ATS चे माजी अधिकारी मेहबूब मुजावर म्हणाले की, मालेगाव स्फोट प्रकरणी मोहन भागवत यांना पकडा, असे मला आदेश मिळाले होते. हिंदू दहशतवाद ही थेअरी खोटी होती. मला मोहन भागवत यांना अडकवण्याच्या सूचना होत्या. मोहन भागवत यांना पकडून हा स्फोट हिंदू दहशतवाद होता हे सिद्ध करायचे होते. हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठीच माझा या प्रकरणाच्या तपासात सहभाग करण्यात आला होता. मला थेट मोहन भागवतांना अडकवण्याचे निर्देश होते. हे आदेश तत्कालीन मालेगाव स्फोट तपासाचे प्रमुख अधिकारी परमबीर सिंह आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला होता असा दावा त्यांनी केला.
तसेच मोहन भागवत आणि अन्य निर्दोष व्यक्तींना या खटल्यात अडकवण्याचा सरकार आणि तपास यंत्रणांचा हेतू होता. हिंदू दहशतवाद ही संकल्पना खोटी होती. संशयितांमध्ये संदीप डांगे आणि रामजी कलसंगरा यांची हत्या झाली होती. त्यांचे जाणुनबुजून आरोपपत्रात जिवंत दाखवण्यात आले. ते मृत असताना मला त्यांचे लोकेशन ट्रेस करण्याचे आदेश दिले होते. जेव्हा मी या गोष्टीचा विरोध करत चुकीचे काम करण्यास नकार दिला तेव्हा माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु मी निर्दोष सुटलो. आता तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी समोर येऊन सांगायला हवे, हिंदू दहशतवाद ही थेअरी वास्तवात होती का? अशी मागणी मेहबूब मुजावर यांनी केली.
दरम्यान, मालेगाव स्फोटातील आरोपी निर्दोष सुटले त्याचा आनंद आहे. त्यात माझेही छोटे योगदान होते. कोर्टाच्या या निर्णयाने एटीएसमध्ये होणारी चुकीची कामे फेटाळली आहेत असंही निवृत्त पोलीस अधिकारी मेहबूब मुजावर यांनी म्हटलं आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास याआधी एटीएसच्या हाती होता. त्यानंतर कालांतराने तो राष्ट्रीय तपास यंत्रणांकडे सोपवण्यात आला होता. मुजावर हे २९ सप्टेंबर २००८ साली झालेल्या मालेगाव स्फोटाचा तपास करणाऱ्या एटीएसचा भाग होते. एटीएसने तेव्हा काय तपास केला, का केला हे मी सांगू शकत नाही परंतु मला राम कलसांगरा, संदीप डांगे, दिलीप पाटीदार आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यासारख्या लोकांबद्दल गोपनीय आदेश दिले होते. हे सर्व भयानक होते. आदेशाचे पालन करण्याचे परिणाम मला माहिती होते. मोहन भागवत यांना पकडलं नाही म्हणून माझ्यावर खोटा खटला दाखल केला. त्यातून माझ्या करिअरचे ४० वर्ष उद्ध्वस्त झाले असंही मेहबूब मुजावर यांनी दावा केला आहे.