शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

यादगार करू या डोंबिवलीचे संमेलन!

By admin | Updated: December 22, 2016 05:22 IST

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ३, ४ आणि ५ तारखेला डोंबिवलीत भरणाऱ्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ३, ४ आणि ५ तारखेला डोंबिवलीत भरणाऱ्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जोरात तयारी सुरू आहे. या प्रतिष्ठित संमेलनाच्या आयोजनाचा मान आगरी युथ फोरमला मिळाला आहे. साहित्य संस्कृतीचे भूषण असणाऱ्या डोंबिवलीत नीटनेटके, सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी असंख्य कार्यकर्त्यांसह साहित्यप्रेमींची लगबग वाढली आहे. आयोजक संस्थेला आगरी महोत्सवाचे आयोजन करण्याचा मोठा अनुभव असल्याने या शहरात पहिल्यांदाच आयोजित होणाऱ्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी आगरी समाज संस्थेने खांद्यावर घेतली आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे हे आगरी युथ फोरम या संस्थेचे अध्यक्ष आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्षांनी संमेलनाची नेमकी काय व कशा प्रकारे तयारी केली आहे, याविषयी त्यांच्याशी साधलेला संवाद...- साहित्य संमेलनाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर कशी आली? आगरी महोत्सवात आम्ही दरवेळेस साहित्यिकांना बोलावत होतो. त्यातून ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी ‘तुम्ही साहित्य संमेलन का भरवत नाहीत, अशी विचारणा केली होती. त्यानंतर, सातत्याने चार वर्षे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे आम्ही, साहित्य संमेलनाचा मान डोंबिवलीला द्यावा, अशी मागणी करीत होतो. ती मागणी महामंडळाने मान्य केली. आगरी महोत्सवामुळे आम्हाला साहित्य संमेलन आयोजनाचा मान मिळाला. - नुकताच आगरी महोत्सव झाला, त्याचे वैशिष्ट्य काय सांगाल?या वर्षीच्या आगरी महोत्सवाच्या व्यासपीठावर निवडून आलेले संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी व स्वागताध्यक्ष म्हणून मी असे तिन्ही अध्यक्ष उपस्थित होते. एकाच वेळी तीन अध्यक्ष एकाच व्यासपीठावर संमेलनापूर्वी येणे, हा दुग्धशर्करा योग महोत्सवात उपस्थित असलेल्यांना पाहावयास मिळाला. याच व्यासपीठावर डॉ. काळे यांचा आम्ही सन्मान केला. त्या वेळी त्यांनी आगरी महोत्सवाचे आयोजन पाहून संमेलनही तितक्याच ताकदीने व चांगल्या प्रकारे यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला. महोत्सव यशस्वी झाला. त्यानंतर, संमेलनाची तयारी सुरू झाली, असे नाही. डोंबिवलीला संमेलन जाहीर झाले, त्या दिवसापासूनच आगरी युथ फोरम तयारीला लागले आहे.- आगरी महोत्सवातून साहित्य संमेलनाच्या आयोजनाची काही सूत्रे गवसली का?आगरी महोत्सवात साहित्य संमेलनाच्या प्रचारासाठी २५ हजार पत्रके वाटली आहेत. अनेकांनी आयोजनाविषयी जे काही अभिप्राय नोंदवले आहेत, ते विचारात घेतले जाणार आहेत. साहित्यिक, उद्योजक, कलाकार, शिक्षक, महिला आदींच्या बैठका घेऊन त्यांच्याकडून सूचना मागवल्या आहेत. आयोजनासाठी उपयुक्त असलेल्या सूचनांचा आम्हाला नक्कीच उपयोग होणार आहे. विविध शाळा, कॉलेजांमधून बैठका घेतल्या आहेत. संमेलनाचा प्रचार व प्रसार चांगल्या प्रकारे झाला आहे. आगरी महोत्सवातही तो केला गेला आहे. प्रचार आणि प्रसाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे.- संमेलनाच्या निधीची जमवाजमव कशी सुरू आहे?विविध आमदार व खासदारांशी निधीकरिता पत्रव्यवहार केला आहे. काही आमदारांनी निधी देण्याचे जाहीर केले आहे. निधी कमी पडू देणार नाही, असे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. त्यांची मदत होत आहे. खासदार कपिल पाटील व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनही मदतीची हमी मिळाली आहे. महापालिकेकडून ५० लाखांचा निधी मिळणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी, महापौर व आयुक्त सकारात्मक आहेत. याशिवाय, विविध स्थानिक स्वराज्य संस्थाही मदत करणार आहे. त्यांनाही पत्रव्यवहार करण्यात आला आहे. - महापौर आधी नाराज होते. त्यानंतर, क्रीडासंकुल आणि इतर ठिकाणचे भाडे माफ केले, हा बदल कसा घडला?सुरुवातीला संमेलन कल्याणला होईल, अशी अपेक्षा महापौरांना होती. संमेलन डोंबिवलीला मिळाले. कल्याण-डोंबिवली ही एकच महापालिका असल्याने ते या शहरांचे महापौर आहेत. कल्याणकर असल्याने त्यांचा कल्याणला संमेलनाचा ओढा मी समजू शकतो. मात्र, ते नाराज होते, असे नाही. त्यांना मी स्वत: जाऊन भेटलो. त्यानंतर, त्यांनी क्रीडासंकुल, बंदिस्त सभागृह मोफत देण्याचे स्पष्ट केले. त्यांची सर्वतोपरी मदत मिळत आहे. त्यामुळे त्यांची नाराजी अशी काहीच नाही. २७ गावांच्या राजकारणाचा फटका संमेलनास बसतो आहे का, राजकारण टाळता येत नाही, असे काही जाणवते का?ही २७ गावे कल्याण-डोंबिवली महापालिकेतून वगळावी, अशी भूमिका सर्वपक्षीय संघर्ष समितीची आहे. समिती त्यावर ठाम आहे. संघर्ष समितीचा मी उपाध्यक्ष आहे. राष्ट्रवादी पक्षाचा पदाधिकारी आहे. त्याचबरोबर आगरी युथ फोरमचा अध्यक्ष आणि आता संमेलनाचा स्वागताध्यक्ष आहे. या चारही जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असून त्यांची सरमिसळ होऊ न देता संमेलन पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. २७ गावांतील जनता संमेलनासाठी आतुर आहे. राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी २७ गावांच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याची भाषा केली आहे. संमेलन आणि २७ गावांचा मुद्दा पूर्णपणे वेगळा आहे. स्वत: नाईक यांनी संमेलनाला मदत करण्याचे स्पष्ट केले आहे. संमेलनासाठी त्यांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. २७ गावांच्या प्रश्नी आम्ही मुरबाड येथील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तसेच, नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात नागपूरला जाऊनही भेट घेतली. संमेलनाआधीच २७ गावांचा प्रश्न निकाली निघणार आहे. त्यामुळे संमेलनाच्या वेळी २७ गावांचा प्रश्न नसेल. त्यामुळे २७ गावांच्या प्रश्नावरून संमेलनास राजकीय फटका बसू शकतो, असे मला तरी वाटत नाही. विविध पदांवर कार्यरत असल्याने संमेलनास फटका बसू देणार नाही, याचीही पुरेपूर काळजी मी घेणार आहे. - साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांची सडेतोड व परखड भूमिका आयोजनासाठी त्रासदायक ठरते आहे का?साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांची सडेतोड व परखड भूमिका ही आयोजनासाठी त्रासदायक ठरत नाही. तसे ठरण्याचे कारणही नाही. त्यांची भूमिका ही मराठी भाषा साहित्य संस्कृती संवर्धनाच्या उद्देशाने पूरक आहे. त्यांच्या भूमिकेची दखल सरकारने घेतली, मराठीजनांनी घेतली. त्यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला, तर त्यातून मराठी भाषा साहित्य संस्कृतीचेच कल्याण होणार आहे. त्यामुळे त्यांच्या परखड व सडेतोड भूमिकेचा त्रास आयोजकांना होतो, असे मानण्याचे काहीच कारण नाही. प्रत्येक आमदार, खासदाराने त्यांच्या वार्षिक निधीतून किमान काहीतरी आर्थिक मदत केल्यास नक्कीच मराठी भाषेला चांगले दिवस येतील. भाषा टिकली तर मराठी समाज टिकणार आहे. आज राज्यभरातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखांना कार्यालये नाही. त्यांच्या कार्यालयांना अपुरी जागा आहे. कोंदट वातावरण, खुर्च्या, टेबल, पंखे नाही. त्यांना हा निधी दिला, तर या शाखा आणखी चांगल्या प्रकारे कार्यरत होतील. त्याचा उपयोग भाषा साहित्य संस्कृतीच्या वाढीस होईल.अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आयोजक संस्था अंतर राखून होती. इतका अलिप्तपणा का? नव्या अध्यक्षांविषयी काय सांगाल?आयोजक संस्थेचा निवडणूक प्रक्रियेशी थेट संबंध नव्हता. आमचे काम केवळ आयोजनाचे आहे. अध्यक्ष निवडीची ही प्रक्रिया मतदार करणार होते. त्याची कार्यपद्धती ठरलेली होती. जो अध्यक्ष निवडून येईल तो आपला, अशी वस्तुनिष्ठ भूमिका आम्ही सुरुवातीपासून ठेवली होती. निवडून आलेले अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे हे अत्यंत योग्य व्यक्ती अध्यक्ष म्हणून लाभली आहे. मराठी साहित्यात डी.लीट वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी मिळवणाऱ्या काळे यांना अध्यक्षपदाचा मान मिळतोय. स्वागताध्यक्ष म्हणून तुम्ही कोणत्या मुद्यावर भर देणार आहात?साहित्य संमेलनाचे आयोजन नीटनेटके कसे होईल, यावर आमचा जास्तीतजास्त भर राहणार आहे. संमेलनाच्या मुख्य कार्यक्रमस्थळी उभारण्यात येणाऱ्या मंडपातील नेपथ्य हे सर्वोत्कृष्ट करण्यावर भर आहे. त्याचे काम कलादिग्दर्शक संजय धबडे यांना दिले आहे. संमेलन परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी योग्य प्रमाणात प्रकाशयोजना, पार्किंगची सुविधा यासह संमेलनात विक्रमी पुस्तकविक्री व्हावी, यावर आमचा भर राहणार आहे. संमेलनात भोजन, नाश्ता, चहापानाची सोय उत्तम ठेवली जाणार आहे. साहित्यिक, मान्यवर, संमेलन प्रतिनिधी यांच्या वास्तव्याची व्यवस्था केली जाणार आहे. नवतरुण साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. साहित्य संमेलनाच्या भोजनाचा मेनू ठरला आहे का?संमेलनाच्या भोजनाचा मेनू ठरलेला नाही. साधे सात्त्विक शाकाहारी भोजन संमेलनात देण्यात येणार आहे. त्या ठिकाणी मांसाहारी जेवण ठेवले जाणार नाही. आगरी भोजनातील तांदळाची भाकर त्या ठिकाणी ठेवली जाणार आहे. संमेलनात आगरी समाजाचे स्थान काय असेल?आगरी समाजाच्या संस्थेला संमेलन आयोजनाचा मान मिळाला, यातच सर्वकाही आले आहे. संमेलनात आगरी समाजाला मराठी भाषेचा सन्मान करण्याची संधी मिळते आहे, हाच आगरी भाषा व संस्कृतीचा मोठा सन्मान आहे. आगरी बोली व संस्कृती ही मराठी भाषा व संस्कृतीचे एक अंग आहे. त्यामुळे मराठीपासून आगरी भाषा वेगळी आहे, असे काही नाही. आगरी बोलीभाषा उपेक्षित आहे. आजही ती बहुतांश प्रमाणात बोलली जात असली तरी तिची लिपी देवनागरी आहे. आगरी भाषेत लिखाण केले जात नाही. संमेलनातील प्रमुख परिसंवादांपैकी एक परिसंवाद बोलीभाषेवर आहे. त्यात, आगरी बोलीभाषेचा समावेश आहे. संमेलनाच्या व्यासपीठावरून आगरीवर चर्चा घडणार आहे. हा या भाषेचा सन्मानच आहे. संमेलनाच्या कार्यक्रमपत्रिकेत आयोजकांच्या सूचनांचा समावेश केला जाणार आहे का?संमेलन कार्यक्रमपत्रिका ठरली आहे. ठरलेल्या पत्रिकेत फारसा बदल होत नाही. करायचा झाल्यास त्याला साहित्य महामंडळाची अनुमती घ्यावी लागते. विविध घटकांशी चर्चा करून जे काही प्रस्ताव, सूचना आलेल्या आहेत, त्यासंदर्भात महामंडळासमोर हा विषय ठेवला जाईल. त्यांच्याशी समन्वय साधून त्यांच्या काही महत्त्वाच्या सूचनांचा ऐनवेळी समावेश केला जाऊ शकतो. त्यांचा एकत्रित कार्यक्रम घेतला जाणार आहे. तसेच स्थानिक कलाकारांचा एक, दोन ते तीन तासांचा कार्यक्रम संमेलनाच्या पूर्वसंध्येच्या आधी करण्याचे विचाराधीन आहे. कल्याणकरांची नाराजी दूर झाली का? कल्याणकरांची नाराजी सुरुवातीला होती. ती साहजिकच होती. कारण, त्यांचीही मागणी होती. आता त्यांची नाराजी नाही. विद्यार्थी संमेलन कल्याणला घेण्यासाठी कल्याणकरांनी पुढाकार घेतला आहे. कल्याणचे राजीव जोशी, भिकू बारस्कर यांच्या टीमसोबत आमच्या बैठका पार पडल्या आहेत. ती मंडळी डोंबिवलीच्या साहित्य संमेलन कार्यालयात येऊन कार्यक्रम ठरवत आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी आता राहिलेली नाही, ती केव्हाच दूर झाली आहे. संमेलनात डोंबिवलीचा वेगळा ठसा कसा उमटेल, यासाठी काय प्रयत्न केले जाणार आहेत?संमेलनाची दिंडी गणेश मंदिर ते क्रीडासंकुल या मार्गावरून काढली जाणार आहे. तिचे स्वरूप भव्य असेल. विविध संस्था त्यामध्ये सहभागी होणार आहेत. डोंबिवलीत भव्य नववर्ष स्वागतयात्रेची परंपरा आहे. ही यात्रा डोंबिवलीतून सातासमुद्रापार पोहोचली आहे. त्याचीच व त्यापेक्षा जास्तीची झलक ग्रंथ दिंडीत असेल. मान्यवर सहभागी होतील. तसेच संस्था, शाळा, कॉलेजचे विद्यार्थी त्यात मोठ्या संख्येने असतील. ग्रंथ दिंडीसह अनेक समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यांचे काम वाटून दिलेले आहे. काही स्वयंसेवक तयार करण्यात आले आहे. येत्या १० जानेवारीपासून कार्यक्रमपत्रिका साहित्यिक, आमदार, खासदार, नगरसेवक, मंत्री, साहित्यिक संस्था, ग्रंथालये, शाळा, कॉलेज, विविध संस्था, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक यांना देण्याचे काम सुरू होईल. काही पत्रिका स्पीड पोस्टने दिल्या जातील. काही मान्यवरांना प्रत्यक्ष पत्रिका देण्यासाठी आयोजन समितीचे व विविध समित्यांचे प्रतिनिधी जातील. स्वागताध्यक्ष म्हणून तुम्ही कोणते आवाहन कराल?साहित्य संमेलन डोंबिवलीत होते आहे. डोंबिवलीला साहित्य संस्कृतीची परंपरा आहे. हे लक्षात ठेवून साहित्य संमेलनास प्रत्येकाने उपस्थित राहावे. संमेलनातील कार्यक्रमांची शोभा वाढवावी. मराठी भाषेचा जागर होणार आहे. तो कशा प्रकारे होत आहे, ते पाहावे. संमेलनात येणाऱ्या प्रत्येकाने किमान एकतरी पुस्तक त्या ठिकाणच्या ग्रंथ प्रदर्शनातून खरेदी करावे. त्यातून पुस्तकविक्री विक्रमी होण्यास मदत होईल. भाषेविषयी असलेले प्रेम, अस्मिता दाखवून देण्यासाठी संमेलनास उपस्थित राहावे. हे संमेलन ताकदीनिशी यशस्वी करण्यासाठी आपला प्रत्यक्ष सहभाग नि उपस्थिती महत्वाची आहे.