कार्ला : परळ-जुन्नर एसटी बसचा (एमचएच १४ बीटी २६७८) मुंबई-पुणे महामार्गावर कार्ला फाटा येथे शुक्रवारी दुपारी मोठा अपघात सुदैवाने टळला.वाहकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने प्रथम कारला धडक दिली. नंतर कार्ला फाटा येथे उभ्या असलेल्या पिक अप व्हॅनला मागून धडक दिली. ब्रेक न लागल्याने निसरड्या रस्त्यावरून बस फिरल्याने विरुद्ध दिशेला ओढ्याच्या लोखंडी कठड्याला धडक देऊन अर्धवट ओढ्यात अधांतरी अवस्थेत थांबली. बसचा मागील भाग कडठ्याला अडकल्यामुळे मोठा अपघात टळला. बस प्रवाशांनी भरली होती. यामध्ये दोन-तीन लहान बालकेही होती. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. परंतु, सर्व प्रवाशी खूप घाबरले होते. शनिवार, रविवार पर्यटकांची मोठी वर्दळ कार्ला फाटा येथे असते. अनेक वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात. कामशेतकडे जाणाऱ्या सहाआसनी रिक्षाही उभ्या असतात. मात्र, अपघाताच्या वेळी या ठिकाणी एकही वाहन उभे नव्हते. सुटीच्या किंवा वाहतुकीच्या वर्दळीच्या दिवशी येथे वाहतूक पोलीस तैनात करण्याची मागणी स्थानिकांकडून सातत्याने होत आहे. (वार्ताहर)> कार्ला फाटा-मळवली रस्ता रुंदीकरणाची मागणीकार्ला फाटा ते मळवली या दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर वाहतूक वाढली असल्याने या रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी होत आहे. भाजे लेणी व धबधबा, लोहगड, विसापूर किल्ल्याकडे जाण्यासाठी हाच रस्ता असून, शनिवार-रविवारी अधिक वाहतूक असते. रस्ता काही ठिकाणी खूपच अरुंद आहे. इंद्रायणी नदीवरील अरुंद पुलावरून एका वेळेस एकच वाहन जाऊ शकते. त्यामुळे पुलावर वाहन घुसवण्याच्या नादात छोटे-मोठे अपघात सतत होत असतात. मळवली ग्रामपंचायतीने जलवाहिनी नेल्याने पुलावरील जागा आणखीच अरुंद झाली आहे. कुस्त्यांच्या मैदानाजवळील खचलेला रस्ता वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. अनेक मोऱ्यांना कठडे नसल्याने रात्री अपघाताची शक्यता वाढली आहे. एक दोन ठिकाणी रस्ता नागमोडी असून, झाडाझुडपांमुळे समोरची वाहने दिसत नाहीत.
एसटी बसचा मोठा अपघात टळला
By admin | Updated: July 31, 2016 01:35 IST