राज्यातील 26 महापौरांचे आरक्षण जाहीर : बीएमसीचे महापौरपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव
मुंबई : राज्यातील 26 महापालिकांच्या महापौरांच्या आरक्षणाची सोडत शनिवारी मंत्रलयात काढण्यात आली. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेचे महापौरपद हे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे या सर्वात मोठय़ा महापालिकेत महिला राज येणार आहे.
26 विद्यमान महापौरांचा कार्यकाळ येत्या वर्षभरात संपणार आहे. कायद्यानुसार महापौरांची मुदत ही अडीच वर्षाची असते. त्यामुळे मुदत संपत असलेल्या महापौरपदासाठी नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्या मुख्य उपस्थितीत सोडत काढण्यात आली. शनिवारी जाहीर झालेले आरक्षण हे विद्यमान महापौरांची मुदत संपल्यानंतर लागू होणार आहे. मुंबईसह ठाणो, नागपूर, नाशिक, पुणो, पिंपरी-चिंचवड आदी मोठय़ा पालिकांमध्ये सप्टेंबरमध्ये नव्या आरक्षणानुसार महापौर निवडणूक होईल.
महापौरपदाचे नवे आरक्षण असे -
खुला प्रवर्ग - ठाणो, कल्याण-डोंबिवली, पुणो, भिवंडी-निजामपूर, औरंगाबाद, मालेगाव, सांगली, जळगाव.
खुला प्रवर्ग महिला - मीरा-भाईंदर, वसई-विरार, अहमदनगर, नांदेड-वाघाळा, चंद्रपूर, अमरावती, अकोला.
इतर मागास प्रवर्ग -नागपूर, नाशिक, लातूर.
इतर मागास प्रवर्ग महिला - उल्हासनगर, कोल्हापूर, परभणी, धुळे.
अनुसूचित जाती प्रवर्ग - नवी मुंबई.
अनुसूचित जाती महिला - मुंबई, सोलापूर.
अनुसूचित जमाती - पिंपरी-चिंचवड.