Disha Salian Death Case ( Marathi News ) : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेंजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची आता पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. दिशाचे वडिल सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मृत्यू प्रकरणाची पुन्हा एकदा सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी या याचिकेत केली आहे. दरम्यान, आता भाजपाचे नेते आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या एक आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूने बोलल्याचे दिसत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार संजय गायकवाड यांनी या प्रकरणातील आरोपामध्ये काही तथ्य नसल्याचे म्हटले आहे.
संजय गायकवाड यांनी ठाकरेंची पाठराखण केली
आज माध्यमांसोबत बोलताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले, दिशा सालियान प्रकरणात सीआयडीच्या तपासात राजकीय नेत्यांचा सहभाग नव्हता. मी आदित्य ठाकरेंची पाठराखण करत नाही, जे तपासात समोर आलंय ते सांगतोय.कोणाकडे काही पुरावे असतील तर द्यायला हवे होते. कोणाकडे काही पुरावे नाहीत म्हणून आदित्य ठाकरे यांना क्लिन चीट दिली. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. पण मागची तीन वर्षे आमचेच सरकार सत्तेवर होते, असंही संजय गायकवाड म्हणाले.
अमोल मिटकरींनी केली पाठराखण
दिशा सालियान मृत्यू प्रकरणाच्या याचिकेवरुन अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. मिटकरी म्हणाले, दिशा सालियन प्रकरणात इतक्या वर्षानंतर याचिका का दाखल करण्यात आली ? इतकी दिरंगाई का केली? राज्यात औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन वातावरण भरकटवले जात आहे. हे महाराष्ट्र समोरचे प्रश्न नाहीत. राजकीय लोकांनी याला हवा देऊ नये. विरोधक आणि सत्ताधारी यांनी दिशा सालियन प्रकरणात महाराष्ट्राचे मूळ प्रश्नांना बगल देऊ नये. प्रशांत कोरटकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली.