Maharashtra Municipal Corporation Election Result 2026 : मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी काल १५ जानेवारी रोजी मतदान पार पडलं. त्यानंतर आज १६ जानेवारी रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यात काही 'धक्कादायक' विजयांची नोंद झाली आहे. गंभीर गुन्ह्याचा आरोप असलेल्या अनेक उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवलाय.
सोलापूर: महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक २ मधून भाजपच्या शालन शंकर शिंदे यांनी विजय मिळवला आहे. सोलापुरातील मनसे नेते बाळासाहेब सरवदे खून प्रकरणी त्या सध्या तुरुंगात आहेत. तुरुंगात असतानादेखील एका उमेदवाराने विजय मिळविल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत रेखा सरवदे आणि शालन शिंदे या दोन्ही उमेदवारांनी भाजपकडून उमेदवारी मागितली होती. भाजपने शालन शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली होती. रेखा सरवदे यांना उमेदवारी मागे घेण्यावरून मोठा राजकीय दबाव निर्माण करण्यात आला.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्यावरून २ जानेवारी रोजी दुपारी वादास सुरुवात झाली. दोघेही एकाच समाजाचे आहेत, भांडण करू नका, असे अंगात मनसे नेते बाळासाहेब सरवदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. या वादविवादात शालन शंकर शिंदेंच्या कुटुंबातील सदस्यांनी धारदार हत्याराने बाळासाहेब सरवदेला खुपसले होते. त्यातच बाळासाहेब सरवदेचा मृत्यू झाला. या घटनेने सोलापूर सह राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. मनसे नेते अमित ठाकरे स्वतः सोलापुरात येऊन सरवदे कुटुंबाची भेट घेऊन संताप व्यक्त केला होता. आता मतदारांनी खून प्रकरणात तुरुंगात असलेल्या शालन शिंदे यांच्या पारड्यात आपलं मत टाकून त्यांना थेट महानगरपालिकेत धाडलं आहे.
पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या प्रभाग क्रमांक २३ मधून सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर विजयी झाल्या. या दोघीनी तुरुंगातुन निवडणूक लढवली होती. आयुष कोमकर हत्या प्रकरणात दोघी तुरुंगात आहेत. सध्या त्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. आंदेकर कुटुंबियांना विशेष न्यायालयाने निवडणूक लढवण्याची परवानगी दिली. आता यांच्या विजयानंतर पुण्यात गुन्हेगारी कमी होईल की आणखीच वाढेल असा सवाल अनेक जण उपस्थित करत आहेत.
जळगाव : महानगरपालिकेच्या निकालाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. या निवडणुकीत 'कोल्हे पॅटर्न' चर्चेत आला आहे. बोगस कॉल सेंटर चालविल्याच्या आरोपावरुन अटकेत असलेले माजी महापौर शिवसेना (शिंदे गट)चे नेते ललित कोल्हे यांनी तुरुंगातूनच प्रभाग क्र. ११ मधून निवडणूक लढवत आपला विजय नोंदवला आहे. केवळ ललित कोल्हेच नाही, तर त्यांची आई सिंधुताई कोल्हे आणि मुलगा पियुष कोल्हे यांनीही विजयाचा गुलाल उधळला आहे. माहितीनुसार, विजयी उमेदवार ललित कोल्हे हे नाशिकमधील कारागृहामध्ये आहेत.
जालना : सर्वात खळबळजनक निकाल जालन्यात पाहायला मिळाला. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी असलेला श्रीकांत पांगारकर जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झाला आहे. श्रीकांत पांगारकरने जालना महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक १३ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. ऑगस्ट २०१८ मध्ये दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मुंबईनजिकच्या नालासोपाऱ्यातून क्रूड बाँब, देशी बनावटीच्या बंदुका यांच्यासह मोठी स्फोटक सामग्री हस्तगत केली होती. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांविषयी माहिती मिळाली होती. याच प्रकरणी श्रीकांत पांगारकर या शिवसेनेच्या जालन्याच्या माजी नगरसेवकालाही दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अटक केली होती. पांगारकर हे पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी असून, काही दिवसांपूर्वीच त्यांची जामिनावर सुटका झाली होती.
Web Summary : Despite facing serious charges, several jailed candidates remarkably won municipal elections in Maharashtra. Key victories include Shalan Shinde (Solapur), linked to a murder case, and candidates from Pune and Jalgaon, highlighting a controversial trend.
Web Summary : महाराष्ट्र में गंभीर आरोपों का सामना कर रहे कई जेल में बंद उम्मीदवारों ने नगर निगम चुनाव जीते। सोलापुर से शालन शिंदे और पुणे और जलगांव के उम्मीदवारों की जीत प्रमुख है।