मुांई : राज्यात अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदमार्फत सुरू असलेली अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांची महाविद्यालये बंद करण्याचा कोणताही मानस नसल्याचा खुलासा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत केला. मात्र ही महाविद्यालये परिणामकारक असायला हवीत, असेही त्यांनी या वेळी सांगितले. सतीश चव्हाण यांनी नियम ९३ अन्वये उपस्थित केलेल्या सूचनेच्या उत्तरादाखल तावडे बोलत होते. यासंदर्भात एका महाविद्यालयातील कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मी प्रश्न विचारला की, डिप्लोमा झाल्यावर काय करणार? तेव्हा ९० टक्के मुलांनी पुढे अभियांत्रिकी पदवी घेणार असल्याचे सांगितले. पदविका शिक्षणाचा हेतू उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळावे हा आहे. जर पदविकेनंतर मुले पदवीला जाणार असतील तर पदविका हवी का, त्यासाठी अभ्यासक्रमात काही बदल करण्याची गरज आहे का, याबाबत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी निर्णय घ्यायला हवा. जी महाविद्यालये आहेत, ती परिणामकारक असली पाहिजेत, अशी भूमिका त्या कार्यक्रमात मांडली. यात पदविका अभ्यासक्रम बंद करण्याचा कोणता विषय नव्हता, असे तावडे यांनी स्पष्ट केले. अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम प्रथम श्रेणीमध्ये पूर्ण केल्यास केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे पदवी अभ्यासक्रमाला थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळतो. या महाविद्यालयांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून मान्यता देण्यात येते, तर महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्याकडून संलग्नता देण्यात येते. मात्र राज्यातील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम बंद करण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आला नसून, यासाठी सरकारने ही महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला नसल्याचेही तावडे यांनी सांगितले.
राज्यात अभियांत्रिकी पदविका बंद करणार नाही
By admin | Updated: March 31, 2015 02:28 IST