Mahadev Jankar News: विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील महापालिकांच्या वेध राजकीय पक्षांना लागले आहे. अनेक पक्षांनी मोर्चेबांधणीलाही सुरुवात केली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी मुंबई महापालिका निवडणुकांसह दिल्ली आणि बिहारमधील निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत महादेव जानकर यांनी माहिती देताना पुढील प्लान सांगितला.
पत्रकारांशी बोलताना महादेव जानकर म्हणाले की, भाजपा आणि काँग्रेसमध्ये काहीही फरक नाही. त्यामुळे मी महायुती किंवा आघाडीबरोबर नाही. स्वत:ची ताकद निर्माण करून स्वत:चे राज्य आणणार आहे. एक दिवस फुले विचारांचाच मुख्यमंत्री आम्ही करू. आता दिल्ली आणि बिहार राज्यात विधानसभा निवडणूक लढवत आहे. महाराष्ट्रात माझा एक आमदार असून, तीन जण थोडक्या मतांनी पराभूत झाले आहेत, असे जानकर म्हणाले.
मुंबई आमचीच म्हणणाऱ्यांना धडा शिकवू
मुंबई आमची आहे, अशी नेहमी ज्याची मक्तेदारी राहिलेली आहे त्यांना आम्ही यावेळेस धडा शिकवू. मुंबई आम्ही स्वबळावरून लढवणार आहोत. तसेच उमेदवारही निवडून आणू, यात काही शंका नाही, असा निर्धार महादेव जानकर यांनी व्यक्त केला. दिल्लीच्या निवडणुका आहेत, त्या सर्व जागा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. वन नेशन वन इलेक्शन ही आमची भूमिका नाही, तर वन नेशन वन एज्युकेशन अशी आमची भूमिका आहे. देशातील सर्वच मुलांना एकच शिक्षण पद्धतीने शिकवले गेले पाहिजे, हाच मुद्दा आमचा दिल्लीच्या निवडणुकीत राहील. भाजपसोबत आम्ही नाही. बिहारची निवडणूक ही आम्ही स्वबळावर लढणार आहोत, असे महादेव जानकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ओबीसी समाजात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मोठी जागृती केली आहे. ते मोठे नेते आहेत. त्यांना सल्ला देणे बरोबर नाही. पण, दुसऱ्याच्या घरात राहण्यापेक्षा स्वत:ची झोपडी, घर असणे आवश्यक आहे, असे जानकर म्हणाले.