लातूर : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी ते मंत्री झाल्यानंतर कसा कामांचा धडाका लावतील, याचा येथील एका कार्यक्रमात लेखाजोखाच मांडला. ५ जानेवारीला माझा मंत्रिपदाचा शपथविधी होईल, असा दावाही त्यांनी केला.मंत्री झाल्यानंतर चौथ्याच दिवशी लिंगायत आरक्षणासंदर्भात बैठक लावीन. बैठकीस अधिकाऱ्यांनाही बोलविणार असून, एखादा अधिकारी सांगूनही आला नाही तर त्याला घरी बसवीन, असा इशारा द्यायलाही ते विसरले नाहीत.येथील बसव महामेळाव्यात बोलताना ते म्हणाले, मला कुठले खाते मिळेल, हे निश्चित नाही. परंतु, खाते कोणतेही मिळाले तरी त्यातून बसव रिसर्च सेंटरला निधी देईन. यदाकदाचित मी ५ जानेवारीला मंत्री होईन. मंत्री झाल्यावर कामकाजाची पद्धत कशी असते, हे आपल्या कर्तृत्वातून दाखवून देईन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याएवढी उंची मी गाठली आहे. त्यामुळे लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याविषयी मी त्यांना विनंती करेन. मंत्री झाल्यावर आरक्षणासंदर्भात बैठक घेतली जाईल. काम होत नसेल, तर नियमावर बोट ठेवून विनाकारण कामे अडवून ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना कायद्यात चौकटीत काम कसे बसते, ते दाखवून देईन. त्यानंतरही त्यांनी काम करण्यास टाळाटाळ केल्यास अधिकाऱ्यांनाही घरी पाठविण्यासही कमी करणार नाही. (प्रतिनिधी)
महादेव जानकर मंत्रिपदाच्या मूडमध्ये!
By admin | Updated: December 29, 2014 05:02 IST