नवी दिल्ली : बँक आॅफ महाराष्ट्रचे ५५.९३ कोटी रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बँक आॅफ महाराष्ट्रचे औरंगाबाद विभागाचे तत्कालीन सहायक सरव्यवस्थापक आणि अन्य १४ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.बँक आॅफ महाराष्ट्रच्या तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, बँक आॅफ महाराष्ट्रचे तत्कालीन सहायक सरव्यवस्थापकांनी २०१२-१३ या कालावधीत अन्य आरोपींशी गुन्हेगारी कटकारस्थान करून कर्जधारकांना बँकेच्या संपत्तीवर कर्ज या योजनेतहत ५ कोटींचे कर्ज मंजूर केले. गहाण मालमत्तेचे खोटे मूल्यांकन करून बँकेसाठी मूल्यांकन करणाऱ्यांनी मूल्य चांगलेच फुगवून दाखविले. कर्जदारांनी या कर्जाचा गैरवापर केला. तसेच कर्जही परत केले नाही. परिणामी, बँक आॅफ महाराष्ट्रचे ४२.३८ कोटी रुपयांचे नुकसान झाले. सीबीआयच्या पथकाने औरंगाबादेत ३१, तर नाशिकमध्ये एका ठिकाणी धाड टाकली.१३.५५ कोटींचे नुकसान केल्याच्या अन्य एका प्रकरणात औरंगाबाद विभागाचे तत्कालीन सहायक सरव्यवस्थापक, औरंगाबादस्थित खाजगी कंपनीच्या चौघांवर आणि बँकेसाठी मूल्यांकन करणाऱ्यांविरुद्ध भादंविच्या विविध कलमांन्वये सीबीआयने गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी औरंगाबाद, परभणी, बीड आणि नांदेड येथे सीबीआयने धाडी टाकून खोटे दस्तावेज आणि काम्प्युटर्सच्या हार्ड डिस्क जप्त केल्या. (प्रतिनिधी)
महाबँकेची फसवणूक, राज्यात सीबीआयच्या धाडी
By admin | Updated: February 12, 2015 03:02 IST