पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात पाणीकपातीचे संकट असताना पिंपरी-चिंचवडकरांना वॉशिंग सेंटरमध्ये गाड्या धुण्याची चंगळ परवडत आहे. पवना धरणात पाणीसाठा कमी आहे. शहरात १ मेपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. शहरातील तरण तलाव बंद ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पाणी बचतीसाठी उपक्रम घेण्यात येत आहेत. पालिकेच्या वतीने पाणीगळती रोखण्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. शहरात ठिकठिकाणी पाणी बचतीचा जागर होत असताना वॉशिंग सेंटरमध्ये दिवसाला ३०-४० गाड्या धुण्यासाठी दाखल होत आहेत.वॉशिंग सेंटरवर दुचाकी, चारचाकी, तसेच अवजड वाहने धुण्यासाठी ग्राहक आणतात. त्या ठिकाणी गाडी फुल्ल वॉश, बॉडी वॉश व पाणी मारणे अशा तीन प्रकारांत धुतली जाते. पाणी मारण्यासाठी जास्त प्रमाणात पाण्याचा वापर होत नसल्याचे दुकानदारांनी सांगितले.फुल्ल वॉशसाठी साधारण ४० लिटर, तर बॉडी वॉशसाठी ८० ते ९० लिटर पाणी वापरले जाते. याप्रमाणे दिवसभरात वॉशिंग सेंटरवर ३० ते ४० गाड्यांसाठी सरासरी २००० लिटर पाणी वापरले जाते. याउलट बादलीत पाणी घेऊन गाडी स्वच्छ करण्यासाठी २० लिटर पाणी वापरता येते.शहरातील तरण तलाव बंद असताना गाडी धुण्याची चंगळ का करावी, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे. ऐन पाणीकपातीच्या काळात दिवसभर गाड्यांच्या रांगा दिसून येत आहेत. (प्रतिनिधी)>गाडी वॉशिंग सेंटरसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद आहे. इतर प्रकारे उपलब्ध होत असलेल्या पाण्याचा योग्य वापर केल्यास पाणीकपातीचे संकट टाळता येईल.- प्रवीण लडकत, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग>साधारणत: दुचाकीसाठी ४० लिटर पाणी, तर चारचाकीसाठी ८० ते ९० लिटर पाणी वापरले जाते. दिवसभरात ग्राहक येतातच; परंतु शनिवार-रविवारी जास्त गर्दी असते. गाडी धुण्यासाठी बोअरिंंगच्या पाण्याचा वापर होतो.- एक व्यावसायिक
शहरातील वॉशिंग सेंटरची चंगळ
By admin | Updated: April 30, 2016 01:03 IST