यदु जोशी, मुंबईसरकारकडून अतिशय स्वस्तात जमिनी घेतलेल्या धर्मादाय हॉस्पिटल्समध्ये २० टक्के खाटा दुर्बल व निर्धन घटकांतील रुग्णांसाठी राखीव ठेवण्याच्या शासकीय आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आला आहे. शासकीय जमिनीवर उभारण्यात आलेल्या धर्मादाय हॉस्पिटलमध्ये २० टक्के जागा दुर्बल,निर्धनांसाठी राखीव आहेत की नाही, यावर विशेष कक्षामार्फत देखरेख ठेवली जात आहे. सामाजिक संघटनेच्या माध्यमातून हजारो रुग्णांना मोफत उपचार मिळवून देणारे ओमप्रकाश शेटे यांना मुख्यमंत्र्यांनी या कक्षाचे कक्षप्रमुख म्हणून नेमले आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ५० हजारांच्या आत आहे ते निर्धन तर ५० हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेले कुटुंब दुर्बल मानले जाते. धर्मादाय हॉस्पिटल्समध्ये निर्धनांसाठी १० टक्के खाटा राखीव ठेवण्याचा आणि अशा रुग्णांवर संपूर्ण मोफत उपचार करण्याचा शासनाचा आदेश आहे. तर, गरीब रुग्णांसाठी १० टक्के खाटा राखीव असून त्यांच्यावरील उपचार खर्चात ५० टक्के सवलत द्यावी लागते. या दोन्ही प्रकारचे रुग्ण सध्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट धर्मादाय हॉस्पिटल्सकडे पाठविले जात आहेत. मुख्यमंत्र्यांकडून आलेल्या रुग्णांना नाकारणे हॉस्पिटल्सना शक्य होत नाही, असा अनुभव शेटे यांनी सांगितला. गेल्या दोन महिन्यांत एकूण १५० रुग्णांना या कक्षामुळे उपचार मिळाले. मुख्यमंत्री सहायता निधी बरोबरच कंपन्यांच्या सामाजिकदायित्व निधीतून (सीएसआर फंड) उपचारासाठी आर्थिक मदत देण्यात येणार असून त्याची सुरुवातही झाली आहे.
गरिबांवरील उपचारांवर मुख्यमंत्री कक्षातून नजर
By admin | Updated: June 4, 2015 04:32 IST