नागपूर : भ्रष्टाचार विरोधी लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लोकायुक्त कायद्यात बदल करून तो अधिक सक्षम करणार, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिली. मतदारांनी दाखविलेला विश्वास आणि दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानण्यासाठी माझ्याजवळ शब्द नाहीत त्यामुळे जनतेच्या ऋणात राहणेच मला मान्य आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच नगरागमन झालेल्या देवेंद्र फडणवीस यांचे आज शहरात दणदणीत स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानापुढील त्रिकोणी मैदानात आयोजित स्वागत समारंभात ते बोलत होते. विद्यमान कायद्यानुसार लोकायुक्तांना विशेष अधिकार नाही, त्यामुळे ते भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करू शकत नाही. अधिकारात वाढ करा, अशी मागणी लोकायुक्तांनी यापूर्वीच्या सरकारकडे केली होती. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आम्ही लोकायुक्तांच्या कायद्यात बदल करू व लोकायुक्तांना अधिक अधिकार देऊ. त्यामुळे लोकायुक्तांना भ्रष्टाचाराविरुद्ध ठोसपणे कारवाई करता येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी माजी खा. बनवारीलाल पुरोहित, महापौर प्रवीण दटके, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, समीर मेघे, डॉ. मिलिंद माने, अनिल सोले, कृष्णा खोपडे, नागो. गाणार, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, सुधाकरराव देशमुख, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, प्रमोद पेंडके मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छापर आशीर्वाद दिले. देवेंद्र यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास नक्की होईल, याची खात्री वाटत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
लोकायुक्त कायदा सक्षम करणार
By admin | Updated: November 3, 2014 03:34 IST