ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 17 - बेस्टला वाचवण्यासाठी कृती आराखडा तयार केल्यानंतरच महापालिकेकडून आर्थिक मदत मिळणार आहे. तोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी प्रशासनाला पुन्हा कर्जाचा आधार घ्यावा लागला आहे. मार्च महिन्याचे कामगारांचे वेतन देण्यासाठी बेस्टने बँकेतून शंभर कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. त्यामुळे पगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या कामगारांना लवकरच दिलासा मिळणार आहे.आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमामध्ये कर्मचाऱ्यांचा पगार प्रत्येक महिन्याच्या 8 ते 10 तारखेपर्यंत होत असे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कामगारांना पगार मिळण्यास पंधरवडा उलटत आहे. फेब्रुवारी महिन्यात 20 दिवस उलटूनही पगार देण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडे पैसे नव्हते. अखेर कामगारांनी संपाचे हत्यार उपसण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर टाटा वीज कंपनीचे पैसे थकवून कामगारांंना 22 मार्चला पगार देण्यात आला होता. मात्र मार्च महिन्यात पुन्हा तोच प्रश्न बेस्टसमोर आहे. आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी बेस्टने पालक संस्था असलेल्या महापालिकेकडे हात पसरले आहेत. मात्र मदत हवी असल्यास आधी तूट कमी करण्याचा आराखडा सादर करण्याची सूचना आयुक्तांनी केली आहे. त्यामुळे आर्थिक मदत मिळण्यास आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या मधल्या काळात बेस्टलाच कामगारांच्या पगाराची तजवीज करावी लागणार आहे. परिणामी मार्च महिन्याचा पगार देण्यासाठी बेस्ट प्रशासनाला पुन्हा कर्ज घ्यावे लागले आहे. या वृत्तास बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी दुजोरा दिला आहे.बेस्ट उपक्रमात 44 हजार कामगार- कर्मचारी- अधिकारी आहेत. बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून आजच्या घडीला दररोज 29 लाख मुंबईकर प्रवास करतात. बेस्ट उपक्रमाच्या विद्युत पुरवठा विभागामार्फत कुलाबा ते सायन, चर्चगेट ते माहीमपर्यंत सुमारे दहा लाख ग्राहकांना वीज पुरवठा केला जात आहे. पुन्हा कर्ज घेतल्यामुळे बेस्ट उपक्रमावर दोन हजार कोटींचा कर्जाचा बोजाा वाढला आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी बेस्टला कर्जाचा आधार
By admin | Updated: April 17, 2017 21:33 IST