लाईव्ह रिपोर्ट : बालटालहून
बाबा अमरनाथांचे डोळेभरून दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर असतानांच काश्मिर घाटीत सुरू झालेल्या लष्कर व दहशतवाद्यांमधील चकमकीमुळे आमच्या मनात भितीचे काहूर निर्माण झाले होते़ सुरक्षेच्या कारणास्तव सैन्याने यात्रेकरूंना बालटालमध्ये रोखून धरल्याची माहिती ‘लोकमत’ला दिल्यानंतर त्यांनी लागलीच खासदार हेमंत गोडसे यांच्याशी संपर्क साधून त्यांना येथील विदारक परिस्थितीबाबत माहिती दिली़ खासदार गोडसे यांनी सैन्यातील वरीष्ठ अधिकाºयांसोबत यात्रेकरुंच्या मदतीबाबत चर्चा केली़ यानंतर सैन्यदल तसेच काश्मिरी घाटीतील नागरिकांनी केलेल्या मदतीमुळे आम्ही रविवारी (दि़१०) रात्री अकरा वाजता बालटालहून जम्मूकडे रवाना झालो़ या मदतीमुळे आमच्या मनातील भीतीचे काहूर संपल्याची प्रतिक्रिया नाशिकच्या पन्नास लोकांच्या चमूतील हेमंत अगरवाल यांनी बालटालहून खास ‘लोकमत’ ला दुरध्वनीद्वारे दिली़ त्यांनी दिलेली माहिती त्यांच्याच शब्दांत़़़
अमरनाथचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर असताना काश्मिर घाटीतील हिंसाचारामुळे सैन्याने बालटालमध्ये तीन दिवस रोखून धरले़ या कालावधीत लंगरसाठी साधनसामुग्री पोहोचत नसल्याने त्यांचाही नाईलाज होता़ दहा-बारा हजार वाहने व सुमारे पंचवीस हजार यात्रेकरूंना अन्नाचा पुरवठा करणे शक्य नव्हते़ मात्र या परिस्थितीतही त्यांनी यात्रेकरूंना उपलब्ध करून दिलेल्या सलाडवर आम्ही दिवस काढले़ रविवारी सकाळी ‘लोकमत’ला फोन केल्यानंतर त्यांनी खासदार गोडसे यांच्यांशी संपर्क साधला व सर्व सूत्रे पटापट हलली़
खासदार गोडसे यांनी प्रशासन तसेच पोलीस अधिकारी रामानंद पांडे यांच्याशी चर्चा केली़ तर आमच्यातील काही यात्रेकरुंनी पंतप्रधान नरेंद्र मोंदींना टिष्ट्वटरवरूनही माहिती दिली़ यानंतर सर्व सूत्रे हलून पोलीस अधिकारी पांडे यांनी स्वत: फोन करून सायंकाळी सहापर्यंत सर्व यात्रेकरूंना जम्मूसाठी सोडण्यात येईल अशी माहिती दिली़ यानंतर बालटालमधील सर्वच यात्रेकरूंना ही माहिती देण्यात आली व रात्री अकरा वाजेच्या सुमारास लष्करी बंदोबस्तात यात्रेकरूंच्या सुमारे दहा- बारा हजार बसेस जम्मूकडे रवाना झाल्या़
बालटालहून जम्मुकडे जात असताना अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे तसेच दगड पडलेले होते, तर दरीमध्ये तीन वाहने कोसळली होती़ नाशिकच्या दोन गाड्या पुढे निघून गेल्या आहेत़ यात्रेकरूंच्या एका बसची तोडफोड केल्याचीही घटना घडली़ मात्र स्थानिक काश्मिरी नागरिकांनी त्यांना वाचवून पहाटेच्या सुमारास पुढील प्रवासासाठी रवाना केल्याचे माहिती मिळाल्याने आमच्या मनातही धास्ती होतीच़ मात्र या रस्त्यावर प्रत्येक पाच दहा पावलावर बंदूकधारी सैनिक तैनात होते़ काश्मिर घाटीतील जवाहर टनेलपर्यंत हा बंदोबस्त कायम असून पुढे जम्मुला बंदोबस्त शिथिल आहे़
सोमवारी (दि़१२) दुपारी साडेबारा वाजेपर्यंत आम्ही सर्व पतनी टॉपपर्यंत पोहोचलो असून लंगरमध्ये जेवण केले़ यानंतर आमचा पन्नास जणांचा जत्था वैष्णोदेवीला जाणार असून तेथील दर्शनानंतर १५ जुलैच्या मंगला एक्स्प्रेसने नाशिकसाठी रवाना होणार आहोत़ तर नाशिकचे उर्वरित शंभर यात्रेकरू १५ जुलै रोजी नाशिकला पोहोचणार आहेत़ बालटलमध्ये अडकलेल्या यात्रेकरूंमध्ये जळगाव येथील अनिल महाजन यांच्यासमवेत १२, दादर येथील तेजस कारंबे यांच्यासमवेत ८०, श्रीरामपूर येथील सुहास परदेशी यांच्यासमवेत २०, नागपूर येथील गणेश कोठारी यांच्यासमवेत १२, कल्याण येथील सतीश कोठेकर यांच्यासमवेत १६, मुंबईतील लक्ष्मण वारे यांच्यासमवेत ८ तर मालेगावमधील दादाजी शेवाळे यांच्यासमवेत १२ यासह सुमारे ७ ते ८ हजार जण हे महाराष्ट्रातील होते़
या प्रवासात एक जण आजारी पडला होता़ त्याच्यावर मिलिटरी रुग्णालयात चांगले उपचार करण्यात आले व तो तंदुरुस्तही झाला़ आमच्या या अडचणीच्या काळात लोकमत व नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी केलेल्या मदतीबद्दल आम्ही आभारी आहोत़