फुलसावंगी (जि़ यवतमाळ) : बोअरवेलमध्ये पडलेल्या अडीचवर्षीय चिमुकल्याला वाचविण्यात आपत्ती व्यवस्थापन दल आणि प्रशासनाला तब्बल १२ तासांच्या परिश्रमाने यश आले. सहा इंच व्यास असलेल्या बोअरवेलमध्ये ४० फूट खोल अडकलेल्या चिमुकल्याने बाहेर काढल्यानंतर आई म्हणून दिलेली हाक अनेकांच्या हृदयाला छेदून गेली. उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथील शेतातील बोअरवेलमध्ये शनिवारी दुपारी ३ वाजता सुरज शंकर आखरे हा पडला होता. त्याला वाचविण्यासाठी प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले. जेसीबीच्या मदतीने बोअरवेलला समांतर खड्डा खोदण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी खड्डा आणि बोअरवेलदरम्यान भुयार खोदले. या भुयारातून मध्यरात्रीनंतर २.३०च्या सुमारास सुरजला सुखरूप बाहेर काढण्यात आले. तत्काळ त्याला फुलसावंगीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बोअरवेलमध्ये पडलेला चिमुकला बचावला
By admin | Updated: February 2, 2015 04:41 IST