गणेश शिंदे - कोल्हापूर -रक्तदान म्हणजे जीवन असे म्हटले जाते, पण रक्ताच्या पिशव्यांचे सातत्याने वाढणारे दर गोरगरिबांना परवडणारे नसल्याने त्यांच्यासाठी जगणेही महाग झाले होते; पण आता शासनाने दिलासा देत रक्तपेढ्यांतील रक्ताच्या पिशव्यांचा दर १०५० रुपयांवरून ८५० रुपये केला आहे. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांना शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २७ एप्रिल २०१५ ला आदेश पाठविला आहे.‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ हे ब्रीदवाक्य असलेल्या गत वर्षात म्हणजे जून २०१४ ला सार्वजनिक आरोग्य विभागाने रक्ताचे सेवाशुल्क ४५० रुपयांवरून थेट १०५० रुपये केले होते. तब्बल सहाशे रुपये, तर खासगी (अशासकीय) रक्तपेढ्यांनी दर साडेआठशे रुपयांवरून ते १४५० रुपये केले आहेत. दिल्ली येथील राष्ट्रीय रक्तसंक्रमण परिषदेने रक्त व रक्त घटकांसाठी आकारावयाचे सेवाशुल्क व प्रक्रिया चाचणी शुल्काबाबत राज्य सरकारला मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नवीन सुधारित सेवाशुल्काबाबत आदेश काढला. दरम्यान, कोल्हापूर शहरात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) व कोल्हापूर महापालिका अशा एकूण दोन शासकीय रक्तपेढ्या आहेत, तर (शहर व जिल्हा मिळून) खासगी रक्तपेढ्या सुमारे १३ आहेत. हल्ली एखाद्या व्यक्तीचा, संस्थेचा किंवा संघटनेचा वाढदिवस असो वा वर्धापनदिन, अशावेळी लोकांकडून, संस्थांकडून रक्तदान शिबिरे घेतली जातात. त्यांना समाजातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आणि या प्रतिसादामुळेच ज्या रुग्णांना रक्ताची अत्यंत गरज आहे, त्यांच्यापर्यंत रक्त पोहोचते.खासगी रक्तपेढ्यांचे दर मात्र चढेच सरकारने ८५० रुपये दर केले तरी खासगीचे दर चढेच आहेत. रुग्णांची गरज ओळखून त्याच्यात वेळोवेळी वाढच केली जाते. त्यामुळे शासनाने सरकारी रक्तपेढ्यांप्रमाणेच खासगी रक्तपेढ्यांना सरकारी दर बंधनकारक करणे गरजेचे आहे, असे मत रुग्णांच्या नातेवाइकांकडून व्यक्त होत आहे.रक्ताच्या नवीन सुधारित सेवाशुल्काबाबत स्थायी समितीच्या सभेत प्रस्ताव ठेवला होता; पण ‘स्थायी’मध्ये पूर्वीप्रमाणेच दर ठेवावेत, असे सांगितले. त्यामुळे सद्य:स्थितीत रक्तपिशवीचे दर पूर्वीचेच आहेत.- डॉ. दिलीप पाटील, प्रभारी आरोग्याधिकारी, कोल्हापूर महापालिका.रुग्णांची संख्या लक्षात घेऊन सरकारी दराप्रमाणे खासगी रक्तपेढ्यांचे दरसुद्धा कमी करणे गरजेचे होते. केवळ शासकीय रुग्णालयांचे रक्तपिशवीचे दर कमी केले. यावरून शासनाची उदासीनता दिसते. - समीर नदाफ, सरचिटणीस, कोल्हापूर जनशक्ती.सीपीआरमध्ये अंमलबजावणी येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (सीपीआर) रक्तपेढीशी याबाबत संपर्क साधला असता, सुधारित सेवाशुल्कानुसार रक्त पिशवीचे साडेआठशे रुपयांप्रमाणे दर आकारण्याची अंमलबजावणी सुरू केल्याचे सांगितले.रक्तदाते वाढलेरक्तदानाबाबत शासकीय संस्था, स्वयंसेवी संस्थांच्यामार्फत जनजागृती केल्याने सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस रक्तदात्यांचे प्रमाण वाढते, ही सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सकारात्मक बाब आहे.
‘जीवन’ झाले स्वस्त
By admin | Updated: May 22, 2015 00:14 IST