पुणो : विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रस्थापित आठ मंत्र्यांचे मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी केली. ही संघटना अवास्तव जागा मागत असल्याचा अपप्रचार सुरू आहे. गेल्या वेळी 38 पैकी 16 जागांवर सेना-भाजपाचे उमेदवार तिस:या क्रमांकावर होते, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
शेट्टी पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. महायुतीतून ‘स्वाभिमानी’ बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे, असे निदर्शनास आणून दिले असता त्याचा इन्कार करीत शेट्टी म्हणाले, आमची 38 जागांची मागणी आहे. ज्या मतदारसंघांमध्ये शिवसेना-भाजपाचे उमेदवार चौथ्या क्रमांकावर होते अशा काही जागा त्यात आहेत. मंत्र्यांविरूद्ध लढण्याची संघटनेची इच्छा असल्याने बारामती, इंदापूर, इस्लामपूर, पलूस, तासगाव, कराड दक्षिण आणि नांदेडमधील भोकर या मतदारसंघांची मागणी केली आहे, असे त्यांनी सांगितले.
9 ऑगस्टला परिषद
राज्यात 3 लाख सहकारी संस्था असून साडेतीन कोटी लोकांची रोजीरोटी त्यावर अवलंबून आहे. मात्र गैरप्रकार, अपप्रवृत्ती आणि भ्रष्टाचारामुळे सहकाराची वाट बिकट झाली आहे. सहकार वाचविण्यासाठी 9 ऑगस्ट रोजी पुण्यात सहकार परिषद आयोजित केली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे परिषदेला उपस्थित राहणार आहेत.