चिकणघर : कल्याण-डोंबिवली महापालिकेने पावसाळ्यापूर्वी गौरीपाडा येथील संत एकनाथ प्राथमिक विद्यामंदिर शाळा क्र . ४२ ची दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे शाळेला गळती लागली असून व्हरांड्यात पाणीच पाणी झाले आहे. वर्गात ये-जा करताना विद्यार्थी भिजत असल्याने आजारी पडण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.संत एकनाथ प्राथमिक शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरतात. महापालिकेने या शाळेची दुरुस्ती न केल्याने दुरवस्था झाली आहे. सध्या पावसाळ्यात विद्यार्थी आणि शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. शौचालयाचे दरवाजे आणि खिडक्याही तुटलेल्या आहेत. त्याकडे शिक्षकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र, प्रशासन आणि नगरसेवक यापैकी कोणाचेही लक्ष नसल्याने शाळेची दुरवस्था झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.यासंदर्भात नगरसेवक व शिक्षण मंडळ सभापती दया गायकवाड यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. >शाळेची तातडीने पाहणी करून ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. -जे.जे. तडवी, प्रभारी शिक्षणाधिकारी, केडीएमसी
गौरीपाड्यातील पालिका शाळेत गळती
By admin | Updated: July 4, 2016 03:43 IST