अशोक पाटील -इस्लामपूर -केंद्रासह राज्यात भाजपची सत्ता आहे. वाळव्याच्या वाघाने (जयंत पाटील) आपला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अबाधित ठेवला. याउलट नागभूमी समजल्या जाणाऱ्या शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीला धक्का बसला. हा धक्का जयंत पाटील यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. शिराळा मतदारसंघात असलेल्या वाळवा तालुक्यातील ४८ गावांतील पाटील यांचेच समर्थक आता छुप्या मार्गाने नागभूमीत जाऊन शिराळ्याचा नाग म्हणजेच शिवाजीराव नाईक यांचा सत्कार करीत आहेत. इस्लामपूर मतदारसंघात भाजपचे बाबासाहेब सूर्यवंशी आणि विक्रम पाटील या दोघांची ताकद होती. याउलट शिराळा मतदारसंघात भाजपचे नामोनिशाणही नव्हते. विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची झूल पांघरुन भाजपचे तिकीट मिळवले. त्यामुळे इस्लामपूरपेक्षा शिराळा मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. वाळवा तालुक्यातील शिराळा मतदारसंघात असलेल्या ४८ गावात जयंत पाटील यांच्याच समर्थकांनी शिवाजीराव नाईक यांना मतांची आघाडी देऊन जयंतरावांनाच धक्का दिला आहे. ज्या मतदारसंघात भाजपचा पाया भक्कम नसताना तो शिवाजीराव नाईक यांच्या रूपाने मजबूत झाला आहे.नाईक हे मंत्रीपदाच्या स्पर्धेत असल्याचे सुरुवातीपासून बोलले जात आहे. त्यामुळेच जयंत पाटील यांच्या समर्थकांनी स्वार्थासाठी छुप्या पध्दतीने नाईक यांचा सत्कार करण्यात धन्यता मानली आहे. यामुळेच त्यांच्या संपर्क कार्यालयावर वर्दळ वाढल्याचे चित्र आहे.पेठनाक्यापासून शिराळा मतदारसंघात असलेल्या वाटेगाव, कासेगाव, नेर्ले, तांबवे, कापूसखेड, कामेरी या गावांमध्ये असलेले कार्यकर्ते नेहमीच कोलांटउड्या मारतात. ज्याच्याकडे सत्ता आहे, तोच आमचा नेता, असे मानणारे हे कार्यकर्ते विधानसभेपूर्वी मानसिंगराव नाईक यांच्या विश्वास कारखान्यावर हजेरी लावताना दिसले, तर निवडणुकीनंतर हेच कार्यकर्ते निवडून आलेल्या शिवाजीराव नाईक यांच्या कार्यालयात वावरताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या तरी वाघाच्या साम्राज्यातील नेत्यांनी नागभूमीत जाऊन शिवाजीराव नाईक यांचा आसरा घेणे पसंद केल्याचे चित्र दिसत आहेत.
वाघाच्या साम्राज्यातील नेते नागभूमीत दाखल...
By admin | Updated: November 9, 2014 23:38 IST