ठाणे : निष्ठावंतांना डावलून महापालिकेत शिवसेनेने सत्ता संपादित केली खरी. परंतु, आता पुन्हा महापौरपदाच्या मुद्यावरून घराणेशाहीविरुद्ध निष्ठावंत, असा वाद उफाळण्याची चिन्हे आहेत. त्यातही, महापौरपदासाठी स्थानिक आमदार आणि खासदारांनी ज्यांनी एकहाती ठाण्यात सत्ता आणली, त्या पालकमंत्र्यांनाच बगल देऊन थेट मातोश्रीलाच दंडवत घातल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता मातोश्रीचा आशीर्वाद कोणाला मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.ठाण्याच्या महापौरपदाची निवडणूक ६ मार्चला होणार असून २ मार्चला अर्ज भरायचे आहे. यंदा महिलांसाठी महापौरपद आरक्षित झाल्याने त्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. हीच संधी साधून खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक यांनी आपापल्या पत्नीला महापौर करण्यासाठी संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यातही विचारे आणि सरनाईक यांनी थेट मातोश्रीवर जाऊन दंडवत घातल्याची माहिती समोर आली आहे. मतदानाला काही तास शिल्लक असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात आनंद दिघेंची सेना राहिलेली नसल्याची टीका करून सेनेतल्या घराणेशाहीवर टीका केली होती. त्यानंतरही महापौरपदासाठी घराण्यांचे लॉबिंग सुरू झाल्याने निष्ठावान विरुद्ध घराणेशाहीचा सामना रंगणार आहे. (प्रतिनिधी) ज्यांनी ठाण्यात विजयश्री एकहाती खेचून आणली, ते एकनाथ शिंदे मात्र या स्पधेतून लांब असल्याचेच दिसते आहे. अशा पद्धतीने थेट आमदार आणि खासदारांनी मातोश्रीवर फिल्डिंग लावल्याने घराणेशाहीला महत्त्व द्यायचे की, निष्ठावंतांना न्याय द्यायचा, अशी काहीशी कोंडी सध्या पालकमंत्री शिंदे यांची झाली आहे. ठाण्यात शिवसेनेला यंदा प्रथमच बहुमताच्या मॅजिक फिगरसाठी कोणतेही कष्ट घेण्याची वेळ आली नाही. स्पष्ट बहुमत मिळाले आहे. असे असताना निष्ठावंतांना संधी न देता पुन्हा महापौरपदासाठी सुरू झालेल्या लॉबिंगमुळे सत्तेसाठी नेत्यांतील साठमारीच रंगणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
ठाणे महापौरपदासाठी नेत्यांचे थेट मातोश्रीवरच लॉबिंग
By admin | Updated: February 28, 2017 03:05 IST