यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी स्मृतिदिनानिमित्त आयोजित वरिष्ठ राज्यस्तरीय निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन गुरूवारी थाटात पार पडले. विशेष म्हणजे तब्बल ३० वर्षांनंतर यवतमाळात होत असलेल्या या स्पर्धेबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. राज्यभरातील नामवंत आणि राष्ट्रीय खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले आहेत. लोहारा एमआयडीसी स्थित स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन आमदार मदन येरावार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी हनुमान व्यायामशाळा क्रीडा मंडळाचे विश्वस्त तथा लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील, महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे सचिव एस.ए. शेट्टी, सदस्य मुकुंद कावेरी, अनिल गुप्ता, जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र वाघ, वरिष्ठ बॅडमिंटनपटू शंकर बर्नेला, जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष अविनाश देशमुख उपस्थित होते. आमदार मदन येरावार म्हणाले, यवतमाळ जिल्ह्याच्या मागासलेपणाचे चित्र बदलण्यासाठी शासन प्रयत्न करेलच. परंतु त्यासाठी आपलीही काही जबाबदारी आहे, हे प्रत्येकाने ओळखले पाहिजे. खासदार विजय दर्डा यांनी यवतमाळच्या विकासासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांच्या प्रयत्नातून विकासही साधला गेला आहे. त्यांच्या सहकार्यातूनच आपणही विकासासाठी आणि खेळाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहू. यवतमाळसारख्या मागास जिल्ह्यात या स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक करीत जिल्ह्यातून बॅडमिंटनचे खेळाडू तयार व्हावे, अशी अपेक्षा येरावार यांनी व्यक्त केली.किशोर दर्डा म्हणाले, हनुमान व्यायामशाळा क्रीडा मंडळाच्या वतीने यवतमाळात आतापर्यंत सहा राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले आहे. आता राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसोबतच यवतमाळ प्रीमिअर लीग ही शालेय विद्यार्थ्यांना क्रिकेटसाठी प्रोत्साहन देणारी स्पर्धा आयोजित केली आहे. यवतमाळात खेलग्राम स्थापन करण्याची खासदार विजय दर्डा यांची महत्त्वाकांक्षा आहे. त्यासाठी ते प्रयत्नशीलही आहेत. त्यांच्या या प्रयत्नात आमदार मदन येरावार यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या वेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी बाबूजींच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर बॅडमिंटन कोर्टवर फीत कापून मदन येरावार यांनी उद्घाटन केले. तसेच बॅडमिंटन विषयावर ‘यशस्वी वाटचाल’ या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते केले. दर्शनी सामना सारंग जयपुरिया आणि स्वप्निल उसगावकर यांच्यात झाला. संचालन अली अब्बास बॉम्बेवाला यांनी तर आभार अशोक नारखेडे यांनी मानले. (क्रीडा प्रतिनिधी)कबीर, गौरव, प्रणव विजयीयवतमाळ : अव्वल मानांकित ठाण्याचा कबिर कंझरकर, नागपूरचे गौरव रेगे व प्रणव लोखंडे यांच्यासह अमरावतीचा अक्षय गजभिये, पुण्याचा हर्षद भागवत, नासिकचा शुभम तिवारी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त यवतमाळ जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या सहकार्याने आजपासून प्रारंभ झालेल्या वरिष्ठ गट महिला व पुरुष बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धेत आगेकूच केली.स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा इनडोअर स्टेडियम (एमआयडीसी) लोहारा येथील स्टेडियममध्ये आयोजित या स्पर्धेत अव्वल मानांकित कबीर कंझरकरने अमित गुप्ताचा २१-५, २१-५ ने सहज पराभव करीत पुढची फेरी गाठली. नागपूरच्या गौरव रेगेने कामगिरीत सातत्य राखताना पुण्याच्या अपूर्व जावडेकरवर २१-९, २१-१३ ने मात केली. अपूर्व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा सुपुत्र आहे. तिसऱ्या फेरीत गौरवला अव्वल मानांकित कबीर कंझरकरच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. नागपूरच्या प्रणव लोखंडेने अमरावतीच्या अमित गेडामची झुंज १६-२१, २१-१७, २१-१५ ने मोडून काढली. दुहेरीमध्ये स्थानिक जोडी डॉ.गणेश राठी व शकिर राणा यांनी अमित गुप्ता व मोहम्मद सैफ वकानी या जोडीवर २१-१०, २१-१७ ने मात केली.
जवाहरलाल दर्डा स्मृती बॅडमिंटन स्पर्धेचा शुभारंभ
By admin | Updated: November 21, 2014 01:48 IST