ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. २९ - कर्जत तालुक्यात आळसुंदे येथे शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कुकडी कालवा फुटला. आवर्तन काळातील ही दुसरी घटना आहे. नांदगांव येथे मागील आठवड्यात कालवा फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले होते. तो कालवा दुरुस्त करण्यासाठी चार दिवस पाणी बंद ठेवण्यात आले होते. आता पुन्हा आळसुंदे-निंबे गावादरम्यान साळुंके वस्तीजवळ कालवा फुटला आहे.
या कालव्याची क्षमता ४०० क्यूसेक इतकी आहे. कुकडीचे पानी ३२५ क्यूसेक वेगाने या कालव्यातून सोडण्यात आले होते. मात्र साळुंके वस्ती जवळ या कालव्याला भगदाड पडल्याने कालव्याच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
या कालव्यातून करमाळा तालुक्यातील मांगी तलावात पाणी सोडण्यात येत होते.हा कालवा पुलानजीक फुटल्याने पुलाच्या चार नळ्याही वाहुन गेल्या. या टप्प्यात २-३ किमी अंतराचे कुकडी चारीचे अस्तरीकरणाचे काम प्रलंबित होते.कालव्याचे पाणी ओढा तसेच मोकळ्या शेतात गेले. पाण्याचा होत असलेला अपव्यय लक्षात घेउन या कालव्याचे पाणी पाटेवाडी, नारजू, थेरवडी तलावात सोडण्याचा निर्णय घेतल्याचे कुकडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.