कणकवली : चिपळूणनजीक मालगाडीचे डबे घसरल्याने कोकण रेल्वेची सेवा मंगळवारी विस्कळीत झाली. काही गाड्या अन्य मार्गे वळविण्यात आल्या तर काही रद्द करण्यात आल्या. सिंधुदुर्गातील प्रवाशांचे यामुळे हाल झाले. गेल्या काही महिन्यात कोकण रेल्वे मार्ग अपघातांनी विस्कळीत होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास चिपळूणनजीक कामथे येथे मालगाडीचे १२ डबे रूळांवरून घसरले. यामुळे मार्ग ठप्प झाला. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या नेत्रावती, मत्स्यगंधा या गाड्या अन्य मार्गे वळवण्यात आल्या. मंगला एक्स्प्रेस या गाडीतील प्रवाशांना बसेसद्वारे पुढील स्थानकावर पोहोचवण्यात आले. दिवा पॅसेंजर, जनशताब्दी, मांडवी या गाड्या रद्द करण्यात आल्या. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस या गाड्या चार तास उशिराने धावणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. रेल्वेचा खोळंबा झाल्याने प्रवाशांनी आपली तिकीटे रद्द करून आरामबसेसकडे मोर्चा वळवला. त्यामुळे आरामबसेसच्या शुल्कात वाढ झाली. (प्रतिनिधी)व्हॉल्वोला विक्रमी ४२०० दररविवारी रात्री मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या व्हॉल्वो गाड्यांसाठी गोवा ते मुंबई ४२०० रूपये इतका विक्रमी दर आकारण्यात येत होता. चार दिवस जोडून सुट्ट्या आल्याने अनेकांनी प्रवासाचे नियोजन केल्याने आरामबसेस चालकांनी याचा फायदा घेतला. गणेशोत्सवातही इतक्या प्रमाणात दर वाढलेला नव्हता.
कोकण रेल्वे वाहतूक विस्कळीत
By admin | Updated: October 8, 2014 00:19 IST