रत्नागिरी : रेल्वेच्या मालगाड्यांवरून माल भरलेल्या ट्रक्सची वाहतूक करणाऱ्या कोकण रेल्वेच्या रो-रो वाहतूक सेवेच्या उत्पन्नाचा आलेख उंचावत आहे. गेल्या सोळा वर्षांच्या काळात रो-रो सेवेद्वारे कोकण रेल्वेला तब्बल चारशे कोटींचा महसूल मिळाला असून, मालवाहतूकदारांचा वाढता प्रतिसाद पाहता रो-रो मालवाहू गाड्यांची संख्या वाढवण्याच्या हालचाली सुरू आहेत. २०१४-१५ या आर्थिक वर्षात रो-रो सेवेपासूून कोकण रेल्वेने तब्बल ७३ कोटींचे उत्पन्न मिळविले आहे. या रो-रो सेवेचा दक्षिणेकडील राज्यांना सर्वाधिक फायदा होत आहे. रस्ते वाहतुकीसाठी इंधनावर होणारा खर्च अधिक असल्याने मालवाहू ट्रक्सची वाहतूक करणारी रो-रो सेवा मालवाहक कंपन्यांना अधिक फायद्याची ठरत आहे. त्यामुळेच या सेवेला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. कोकण रेल्वेने १९९९ पासून सुरू केलेल्या मालवाहतूक सेवेतील गतवर्षात झालेले उत्पन्न हे विक्रमी असल्याचे कोकण रेल्वेच्या सुत्रांनी सांगितले. रस्ते वाहतुकीसाठी ट्रक्सना अधिक वेळ द्यावा लागतो. त्यात वेळेचा मोठा अपव्यय होतो. पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनावरही मोठा खर्च करावा लागतो. यावर कोकण रेल्वेने मालगाडीवरून एकावेळी ४५ ते ५० ट्रक्सची वाहतूक करणारी रो-रो सेवा सुरू केली. या सेवेमुळे कोलाड-वेर्ना, कोलाड-सुुरतकल (कर्नाटक) पट्ट्यात वाहतुकीला चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. रो-रो सेवेमुळे कोकण रेल्वेला आतापर्यंत ४०० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. या सेवेला यंदा १६ वर्षे पूर्ण झाली आहेत. (प्रतिनिधी)सोळा वर्षात ४ लाख ट्रक्सची वाहतूकरो-रो सेवेअंतर्गत कोकण मार्गावर दररोज तीन ते चार मालगाड्या धावत आहेत. प्रत्येक मालगाडीवर किमान ४५ ते ५० ट्रक्स असतात. आतापर्यंत ४ लाख ट्रक्सची वाहतूक करण्यात आली आहे. १६ वर्षांत या सेवेद्वारे ८०० लाख लीटर्स डिझेलची वाहतूक करण्यात आली आहे. या सेवेला प्रतिसाद वाढणार असल्याचा विश्वास कोकण रेल्वेने व्यक्त केला आहे.
कोकण रेल्वेला सोळा वर्षात चारशे कोटींचा महसूल
By admin | Updated: May 22, 2015 00:15 IST