रत्नागिरी : स्वच्छतेचा नगारा वाजवणाऱ्या कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकावरील प्रसाधनगृहांमध्ये अस्वच्छता व दुर्गंधीचे साम्राज्य असून, प्लॅटफॉर्म नं. १ वरील प्रसाधनगृहाचा वापरच प्रवाशांनी बंद केला आहे. तर २ नंबर प्लॅटफॉर्मवरील प्रसाधनगृहाला सहा महिन्यांपासून टाळे आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिनाभरापूर्वी देशभरात राबवलेल्या स्वच्छता मोहिमेचा कोकण रेल्वे स्थानकांवर फुगा फुटला असून, मार्गावरील अन्य स्थानकांवरही प्रसाधनगृहांबाबत बोंबच आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी २ आॅक्टोबरला देशभर राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. त्यावेळी ६ हजार कर्मचारी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. त्यावेळी स्थानकांवर स्वच्छता झाली, खरी परंतु ती बाह्य स्वच्छता काही काळापुरता दिखावा ठरली, अशी स्थिती या स्थानकांवर आजच्या घडीला आहे. रत्नागिरी हे मार्गावरील मोठे व महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. रत्नागिरीत कोकण रेल्वेचे विभागीय कार्यालयही आहे. असे असताना या महत्त्वाच्या रेल्वेस्थानकातील स्वच्छतेची पुरती वाट लागली आहे. या दोन्ही स्वच्छतागृहांबाबतची स्थिती काहीनी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक भानूप्रकाश तायल यांच्या कानावर घातली होती. श्रमशक्ती दिनी रत्नागिरीत आल्यानंतर तायल यांनी संबंधितांना या प्रसाधनगृहांबाबत योग्य कार्यवाहीचे आदेश दिले होते. त्यानंतर वरिष्ठ स्तरावरून एका अधिकाऱ्यानेही या स्वच्छतागृहांची रत्नागिरी स्थानकावर पाहणी करूनही आठवडा उलटला तरी या प्रसाधनगृहांची स्थिती जैसे थे आहे.रत्नागिरी स्थानकातून प्लॅटफॉर्म नंबर २ वरून सकाळी दादर पॅसेंजर ही रेल्वे दररोज सुटते. या गाडीला रोजचीच प्रचंड गर्दी असते. हजारो लोक या गाडीने ये-जा करीत असतात. मात्र प्रवाशांना प्लॅटफॉमर्वर प्रसाधनगृहाची सुविधाच उपलब्ध नाही. या प्लॅटफॉर्मवरील प्रसाधनगृहास चक्क टाळे ठोकण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून या सुविधेपासून प्रवासी वंचित आहेत. ही सुविधा प्रवाशांना उपलब्ध व्हावी, अशी मागणी होत आहे. केवळ दिखाऊपणासाठीच...एक प्रसाधनगृह घाणीने बरबटलेले, दुसरे सहा महिने बंदच.प्लॅटफॉर्मलगतची गटारेही घाणीने तुंबलेली.६ हजार कर्मचाऱ्यांनी घेतला होता स्वच्छता मोहिमेत सहभाग. दिखाऊ ठरली रेल्वे स्थानकावरील स्वछता.प्रसाधनगृहाबाबत सर्वत्र बोंबाबोंब सुरूच.(प्रतिनिधी)प्लॅटफॉर्मवरील गटारही तुंबलेले...प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील बाहेरून चकाचक परंतु आतून गलिच्छ असलेल्या पुरुष व महिलांसाठीच्या प्रसाधनगृहाजवळून प्लॅटफॉर्मला समांतर असलेले गटार सांडपाण्याने भरलेले आहे. त्यात घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. दुर्गंधी व डासांमुळे या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या प्रवाशांच्या तसेच विविध स्टॉल्समध्ये असलेल्या कामगारांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या गटारातील तुंबलेल्या पाण्यात प्लास्टिक पिशव्या, कचरा कुजला असून, भयावह स्थिती आहेपथनाट्यातून बोध नाहीच...देशातील स्वच्छता मोहिमेच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकाच्या प्रवेशद्वारावर २ आॅक्टोबर २०१४ रोजी दुपारी कर्मचाऱ्यांनीच स्वच्छतेचे महत्त्व सांगणारी व प्रबोधन करणारी तीन पथनाट्ये सादर केली होती. अस्वच्छतेमुळे आरोग्याला कसा धोका निर्माण होतो, याबाबत या पथनाट्यांतून प्रभावी प्रबोधन करण्यात आले होते. मात्र, हे प्रबोधन दिखाऊ होते की काय, ते कर्मचाऱ्यांसाठी नसून केवळ लोकांसाठीच होते काय, असा प्रश्न स्थानकातील प्रसाधनगृहांच्या अस्वच्छतेवरून विचारला जात आहे.
कोकण रेल्वेच्या स्वच्छतेचा फुटला फुगा!
By admin | Updated: November 3, 2014 23:25 IST