मुंबई : मागील वर्षी रेल्वेच्या दुर्लक्षित कारभारामुळे एसी डबल डेकरला प्रवाशांनी प्रतिसाद न दिल्याने, उशिरा शहाणपण सूचलेल्या रेल्वेने यावेळी डबल डेकर नियमित सुरू केली. त्याचा रेल्वेला चांगलाच फायदा झाला असून, पहिल्याच दिवशी ५२ टक्के प्रतिसाद प्रवाशांकडून मिळाल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. एलटीटी ते मडगाव अशी एसी डबल डेकर ट्रेन मागील वर्षी गणेशोत्सवकाळात सुरू केली. मात्र, प्रीमियम म्हणून सुरू केलेल्या या ट्रेनला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला. अव्वाच्यासवा भाडे वाढत जात असल्याने प्रवाशांनी अक्षरश: पाठच फिरवली. आता पुन्हा एकदा एसी डबल डेकर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि नवीन एसी डबल डेकर ९ डिसेंबरपासून एलटीटी ते मडगाव सुरू करण्यात आली. या पहिल्या दिवशीच ५२ टक्के प्रतिसाद मिळाल्याची माहिती मध्य रेल्वेतील एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली. जवळपास ८९0 प्रवाशांनी या ट्रेनमधून प्रवास केला. प्रवाशांची कसरतएलटीटीहून एसी डबल डेकर पहाटे साडे पाच वाजता सोडण्यात येते. त्यामुळे पश्चिम उपनगरातील प्रवाशांना ही ट्रेन पकडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अर्थात, कमी दरामुळे चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा रेल्वेचे अधिकारी व्यक्त करतात.
कोकणच्या एसी डबल डेकरला ५२ टक्के प्रतिसाद
By admin | Updated: December 11, 2015 01:57 IST