मनीषा म्हात्रे / पूजा दामले, मुंबईकोणत्याही रुग्णाचे अवयव प्रत्यारोपण होण्यापूर्वी डॉक्टर, रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक यांची किमान १५ वेळा तरी भेट होते. त्याचबरोबर अवयवदात्यांशी ही डॉक्टरांची भेट होते. दाता आणि रुग्णाच्या शारीरिक तपासण्या होतात, त्यांचे समुपदेशन होते आणि मगच प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पाडली जाते. पण, हिरानंदानीतील डॉक्टरांनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेपूर्वी आपली अवघे १५ मिनिटे रुग्ण आणि दात्याशी भेट झाल्याची माहिती दिल्याने चौकशी अधिकाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात सक्रिय असलेले किडनी रॅकेट उघड झाल्यावर सार्वजनिक आरोग्य सेवा विभागातर्फे एका त्रिसदस्यीय चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या चौकशी समितीसमोर डॉक्टर लपवाछपवी करत असल्याचे माहिती अहवालातून समोर आले आहे. डॉक्टर, रुग्ण आणि दाता यांच्यात संवाद होतोच. पण, किडनी रॅकेट प्रकरणात असा संवाद झालाच नसल्याचे म्हणत डॉक्टर हात झटकत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे या डॉक्टरांची आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश कांबळे याची ही समिती पुन्हा चौकशी करणार आहे. ‘तुम्ही पुण्याचे काम करत आहात, अवयवदान हे मोठे दान आहे’ असे दात्याला डॉक्टरांकडून सांगण्यात येत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. रुग्णालयातील मुख्य अधिकारी आणि डॉक्टरांच्या सहमतीनेच हे सर्व काळे धंदे सुरु असल्याचा अंदाज समितीने वर्तविला होता. त्यानंतरच पोलिसांनी चौकशीची दिशा ठरविली. डॉ. मुकेश शेट्टी हा दिवसाला ४ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करत असल्याची माहिती मिळाली आहे. आणि हा डॉक्टर मुंबईतील अन्य काही रुग्णालयांशी देखील संलग्न आहे. एथिक्स कमिटीमध्ये आरोग्य सेवा विभागाचा एक अधिकारी, त्या रुग्णालयातील एक एमडी डॉक्टर (ज्याचा प्रत्यारोपणाशी संबंध नाही) आणि शासकीय सेवेतून निवृत्त झालेले चार अधिकारी अथवा कार्यरत अधिकारी यांचा समावेश असतो. ही कमिटी रुग्ण आणि दात्याची मुलाखत घेते. त्यानंतर प्रत्यारोपण प्रक्रिया सुुरु केली जाते. पण, या कमिटीआधी डॉक्टर आणि रुग्णांची भेट होते. मात्र तरीही अटक आरोपींच्या वकिलांनी एथिक्स कमिटीकडे बोट दाखवत हात झटकत असल्याचे दिसत आहेत.
किडनी रॅकेट : डॉक्टर म्हणे...फक्त १५ मिनिटांपूर्वी झाली भेट
By admin | Updated: August 11, 2016 04:42 IST