- संजय तिपाले, बीड
अल्पपर्जन्यमान, घटलेली पाणीपातळी व त्याचा जीवनमानावर झालेला थेट परिणाम या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने पाण्याच्या बाबतीत ठाणी व वसाहती स्वयंपूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. वृक्षलागवड मोहिमेसोबतच आता जलपुनर्भरणाची कामे तेथे युद्धपातळीवर सुरु आहेत.सर्व तालुक्यांचे ठिकाण व ग्रामीण भागात असलेल्या ठाण्यांना जोडूनच वसाहती आहेत. मात्र, सतत तीन वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाण्याची पातळी सात मीटरपर्यंत खाली गेली. त्यामुळे पाण्याअभावी इतरांप्रमाणेच पोलीस कुटुंबियांचेही हाल झाले. अधीक्षक कार्यालयालाही टंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या. पोलीस प्रशासनाच्याच टँकरद्वारे उन्हाळ्यात येथे पाणीपुरवठा सुरु होता. कार्यालयासमोरील सुशोभिकरण जगविताना मोठी तारांबळ उडाली. दुष्काळाच्या संकटातून तावून, सुलाखून निघालेल्या पोलीस प्रशासनाने चांगलाच ‘धडा’ घेतला आहे. अधीक्षक अनिल पारसकर यांनी पोलीस वसाहती, अधीक्षक कार्यालय व सर्व ठाण्यांमधील बोअरचे जलपुनर्भरण करण्याचे काम हाती घेतले. त्यासाठी बीड पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता एम. एस. वाघ यांनी त्यांना ‘लो बजेट’चा ‘फॉर्म्यूला’ दिला. अवघ्या १५ ते २० हजार रुपयांत एका बोअरचे पुनर्भरण केले जात आहे.दोन वर्षांत ४ हजार ८०० रोपांची लागवड- पर्यावरण रक्षणातही बीडचे पोलीस प्रशासन मागे नाही. गतवर्षी २३०० रोपांची लागवड केली होती. दुष्काळी स्थितीतही ही रोपे जगविली आहेत. तर यंदा १ जुलै रोजी अडीच हजार झाडे लावण्यात आली आहेत.पर्यावरण रक्षणासाठीउन्हाळ्यात पाण्याची टंचाई ठिकठिकाणी जाणवली. त्यामुळे जल-पुनर्भरणाचा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवायचा आहे. पोलीस कल्याण निधीतून कमीतकमी खर्चात ही कामे करणे सुरु आहे. पर्यावरण रक्षणाला हातभार लागावा म्हणून वृक्षारोपण करुन रोपेही जगविली आहेत.- अनिल पारसकर, पोलीस अधीक्षक, बीड.