कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सदस्यांची केलेली निवड वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या सदस्याला डावलून अपक्ष गटातील सदस्याची केलेली नियुक्ती चुकीची असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीने कोकण विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्याचा पवित्रा घेतला आहे. महापालिकेच्या बुधवारच्या विशेष महासभेत ११ महिला सदस्यांची नियुक्ती महिला व बालकल्याण समितीवर करण्यात आली. यात राष्ट्रवादीकडून दर्शना म्हात्रे आणि माधुरी काळे यांची नावे देण्यात आली होती. परंतु, महापौर कल्याणी पाटील यांच्याकडून केवळ दर्शना म्हात्रे यांचीच वर्णी समितीवर लावण्यात आली आहे. तर अन्य एका जागेवर अपक्ष गटाच्या उषा वाळंज यांना प्राधान्य देण्यात आले आहे. याला राष्ट्रवादीच्या सदस्या माधुरी काळे यांनी आक्षेप घेतला. यावर त्यांचा आक्षेप नोंदवून घेत नियुक्ती प्रक्रिया ही तौलनिक संख्याबळाच्या आधारेच केल्याचा दावा महापौर पाटील यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
केडीएमसीची सदस्य निवड वादात अडकणार
By admin | Updated: December 26, 2014 02:17 IST