ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. ५ - ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत एम.एम.कलबुर्गी यांच्या हत्त्येसंदर्भात पोलिसांनी नेमका काय तपास केला यासंबंधीची माहिती देण्यासाठी मंगळवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री एम. सिध्दरामय्या यांच्या समवेत कलबुर्गी कुटुंबियांची भेट होत आहे. सकाळी अकरा वाजता बंगळूरला मुख्यमंत्र्यांच्या दालनात ही भेट होणार असून त्यांच्यासमवेत गणेशदेवी यांच्यासह अन्य साहित्यिकही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
कलबुर्गी यांच्या हत्येला परवाच्या ३० आॅगस्टला एक वर्ष झाले. परंतू त्यांच्या मारेकऱ्यांच्या तपासात फारशी प्रगती झालेली नाही. त्यांच्या पहिला स्मृतिदिनादिवशी झालेल्या कार्यक्रमात नाराजी व्यक्त झाली. कर्नाटक शासन तपासाला गती मिळावी यासाठी कांही करत नसल्याची टीका तिथे जमलेल्या विचारवंतांकडून झाली. या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या स्नूषा मेघा पानसरे या देखील उपस्थित होत्या. त्यांनी पानसरे हत्येचा जसा उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास सुरु आहे, त्याप्रमाणे कलबुर्गी हत्येचाही तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हायला हवा व त्यासाठी कलबुर्गी कुटुंबियांनी कर्नाटक उच्च न्यायालयात त्यासाठी दावा दाखल करावा असे सूचविले.
त्याची दैनिक ‘हिंदू'सह कर्नाटकातील सर्वच वृत्तपत्रांनी दखल घेतली. त्यानंतर चक्रे फिरून मुख्यमंत्री कार्यालयाकडून चर्चेसाठी निमंत्रण आले आहे. तपासावर न्यायालयाचे नियंत्रण आले की पोलिसांना प्रत्येक वेळी तपासात काय प्रगती झाले हे सांगावे लागते. तो दबाव पोलिस प्रशासनावर येतो. विचारवंतांनी राज्य शासनावर तपासाबाबत टीका केली आणि आपण कांहीच केले नाही असे होवू नये म्हणून मुख्यमंत्र्यांकडून तातडीने चर्चेसाठी बोलविण्यात आले आहे.
मुख्यमंत्री या तपासाबाबत काय माहिती देतात किंवा शासन गुन्हेगारांना शोधण्यासाठी कितपत गंभीर आहे हे पाहून न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे कुटुबियांकडून सांगण्यात आले.