औरंगाबाद: वर्दळीच्या काल्डा कॉर्नर परिसरात बुधवारी रात्री पल्सरस्वार तीन अज्ञात लुटारूंनी एका व्यापाऱ्याला आडवून मारहाण करीत त्याचे तीन लाख रुपये लुटले. या झटापटीत एक लाख रुपये खाली पडले. उरलेले दोन लाख रुपये घेऊन पळून जाण्यात लुटारू यशस्वी झाले. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर सर्वत्र नाकाबंदी करून पोलिसांनी लुटारूंचा शोध सुरु केला.घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, निमेश पटेल (३२, रा. राठी कॉम्पलेक्स, काल्डा कॉर्नर) हे फायनान्सचा व्यवसाय करतात. गुलमंडीत त्यांचे कार्यालय आहे. नियमित पैशांची ने आण ते करीत असतात. नित्याप्रमाणे बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ते मित्रासोबत स्कुटीवर घरी येत होते. मित्र स्कुटी चालवित होता. पटेल त्यांच्याजवळ एक बॅगमध्ये तीन लाख रुपये रोख रक्कम होती.
घराजवळच दबा धरून बसले लुटारूआठ वाजून दहा मिनिटांनी घराजवळच येताच एका पल्सरवर आलेल्या तिघांनी पटेल यांची दुचाकी आडविली आणि चल पैसे निकाल असे म्हणत त्यांच्या हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. पटेल यांनी विरोध करताच तिन्ही आरोपींनी त्यांना मारहाण सुरू केली. मारहाण करीत आरोपींनी त्यांच्या हातातील बॅग हिसकावली. या झटापटीत बॅगमधील एक लाख रुपये ठेवलेली कॅरीबॅग खाली पडली. नंतर तिन्ही आरोपी दोन लाख रुपये घेऊन पल्सरवर बसून सुसाट वेगाने पसार झाले. यावेळी तेथे येणाऱ्या जाणाऱ्यांची बरीच वर्दळ होती. काही समजण्याच्या आत लुटारू पसार झाले. पटेल यांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला; परंतु ते हाती लागले नाहीत. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त राहूल श्रीरामे, सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती, उस्मानपुरा ठाण्याचे निरीक्षक टाक यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. नंतर संपूर्ण शहर व परिसरात नाकाबंदी करण्यात आली. मात्र, लुटारूंचा थांगपत्त लागला नाही. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
असाही प्रमाणिकपणा..लुटारूंसोबत झालेल्या झटापटीत पटेल यांच्या बॅगमधील एक लाखांनी भरलेली कॅरीबॅग खाली पडली होती. त्यावेळी तेथे जवळच राहणारे स्वप्नील साबळे या तरुणाला ही कॅरीबॅग नजरेस पडली. त्याने ती उचलली. त्यात एक लाख रुपये रोख होती. स्वप्नीलने प्रमाणिकपणा दाखवित हे एक लाख रुपये पटेल यांना परत दिले.